
Ashadhi Wari : नगर : यंदा ‘अल निनो’च्या (El Niño) संभाव्य परिणामांमुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी करण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिंडी चालकांना केले आहे. आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात दिंडी चालक यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पंकज आशिया, निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे प्रमुख यांच्यासह जिल्ह्यातील दिंडी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : धरणांतील पिण्याचे पाणी ३० सप्टेंबरपर्यंत राखून ठेवणार; पाऊस लांबल्याने मुदत वाढविली
२ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर
पालकमंत्री म्हणाले की,आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली असून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तीन जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी यापूर्वी जिल्हा परिषदेला २ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यावर्षी हा निधी वाढवून ३ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आला असून त्याबाबतचे पत्र २५ तारखेपर्यंत पाठविण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पालखी मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त असणार (Ashadhi Wari)
वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी मंगल कार्यालयांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच पालखी मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून याबाबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशीही समन्वय साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत वारकऱ्यांना आरोग्य सेवा व उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, यंदा ‘अल निनो’च्या संभाव्य परिणामांमुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी करण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिंडी चालकांना केले आहे. मोठ्या प्रमाणावर टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य नसले तरी प्रशासन सर्व आवश्यक उपाययोजनांसाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाणीसाठा राखीव ठेवण्याच्या सूचना
सध्या जिल्ह्यातील १६२ गावातील ९०८ वाडे वस्त्यांवर १५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून पाऊस लांबल्यास या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध पाणीसाठा राखीव ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध असल्याचे सांगत कृषी व पशुसंवर्धन विभागाला परिस्थितीचा नियमित आढावा घेण्याच्या तसेच सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टँकरचे पाणी विहिरींमध्ये सोडू नये, त्याऐवजी स्वतंत्र पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.


