
ढवळपुरीतील आदिवासी कुटुंबांचा तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा; जमीन परत मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार
Indefinite hunger strike against encroachment : पारनेर : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील आदिवासी जमिनीवरील कथित बेकायदेशीर बांधकाम आणि जमीन बळकावल्याच्या आरोपांवरून अन्यायग्रस्त आदिवासी कुटुंबांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आदिवासींच्या मालकीच्या जमिनीवरील बांधकाम (Indefinite hunger strike against encroachment) हटवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवार दि. २५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पारनेर तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
अनेक कुटुंबांवर भूमिहीन होण्याची वेळ आल्याचा दावा
महादु तुकाराम पवार, दशरथ भाऊ केदार, खेवजी भिमा चिकणे, सुनिल उमाजी केदार, लिलाबाई सोमनाथ केवाळे, हिरामण नागु केदार आणि आनंदा दगडु केदार या ढवळपुरी येथील जमीनधारक आदिवासी नागरिकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप केले आहेत.
निवेदनानुसार, ढवळपुरी येथील गट क्रमांक ११२०/२/१ ते ७ मधील सुमारे ४६ एकर क्षेत्र असलेल्या आदिवासींच्या जमिनीवर कथित अतिक्रमण करून कोट्यवधी रुपयांचे बांधकाम उभारले आहे. या प्रक्रियेमुळे आदिवासी जमीनधारकांना त्यांच्या मालकीच्या जमिनीपासून वंचित राहावे लागले असून अनेक कुटुंबांवर भूमिहीन होण्याची वेळ आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच, या बांधकामासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात असून बाहेरील राज्यांमधून मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याने प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आदिवासींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप (Indefinite hunger strike against encroachment)
आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत अन्यायग्रस्त कुटुंबांनी एकलव्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे क्रांतिकारी राया ठाकर फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष लहू मधे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असून उपोषणकर्त्यांच्या जीवितास काहीही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
आदिवासी समाजाच्या प्रमुख मागण्या
आदिवासी जमिनीवरील कथित बेकायदेशीर बांधकाम त्वरित हटवून जमीन मूळ आदिवासी मालकांच्या ताब्यात द्यावी.
संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.
संबंधित जमिनीवर सुरू असलेले धार्मिक कार्यक्रम तात्काळ बंद करावेत.
आदिवासींना भूमिहीन करण्यास जबाबदार असलेल्या सर्व संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावेळी एकलव्य सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे, राया ठाकर फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष लहू मधे, संजय पथवे, मनाजी मधे, बाळू मधे, मारुती केदार, हिरामण केदार, उमाजी केदार, पोपट केदार, भीमा चिकणे, भाऊ केदार, विश्वनाथ पवार, प्रवीण केदार, पांडू केदार, बाळू चिकणे, जिजाबा मधे, महादू पवार यांच्यासह आदिवासी समाजातील ग्रामस्थ आणि जमीनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणामुळे ढवळपुरी परिसरातील आदिवासी जमीन हक्कांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


