
Caste certificate cancelled : नगर : कोपरगाव नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्राच्या मदतीने पद मिळविले असून त्यांचे पद रद्द व्हावे याबाबत अहिल्यानगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. सदरच्या तक्रारीची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दखल घेवून सर्व कागदपत्रांची पडताळणी केली असता जितेंद्र रणशूर यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिसून आल्यामुळे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचा जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आला असून त्यामुळे त्यांचे उपनगराध्यक्षपदही लवकरच जाणार आहे हा काळे गटाकडून हा कोल्हे गटाला देण्यात आलेला मोठा झटका मानला जात आहे.
हेही वाचा : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; एका विद्यार्थिनीचा मृत्यू, अनेक जखमी
यांनी केली तक्रार
२०२५ मध्ये पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ हा प्रभाग एस.सी.प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे या प्रभागातून निवडणूक लढवणारा उमेदवार हा एस.सी. प्रवर्गातीलच असणे आवश्यक होते. परंतु या प्रभागातून आपले नाम निर्देशनपत्र भरतांना विद्यमान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी आपल्या नाम निर्देशनपत्रात आपल्या जातीचा केलेला उल्लेखच चुकीचा होता. उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी खोटी माहिती देवून बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढविली असून त्याबाबतचे सर्व पुरावे व सर्व कागदपत्रांची पूर्तता करून त्यांचे पद रद्द करण्यात यावे अशी तक्रार अहिल्यानगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सागर आहेर यांनी केली होती. त्या तक्रारीची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने गांभीर्याने दखल घेवून त्याबाबत सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
नक्की पहा : मंत्री भुसे यांचे वाहन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवले
प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय (Caste certificate cancelled)
त्यामुळे जितेंद्र रणशूर यांनी आपल्या नाम निर्देशनपत्रात आपल्या जातीबाबत खोटी माहिती दिली असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे जितेंद्र रणशूर यांनी दिलेला जात प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय अहिल्यानगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. सागर आहेर यांच्या वतीने वतीने अॅडव्होकेट मुन्ना सय्यद यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा मोनिका सिंह, सदस्य राकेश पाटील आणि सदस्य सचिव अनिल तिदमे यांनी संयुक्तपणे दिलेल्या आदेशानुसार जितेंद्र रणशूर यांनी अनुसूचित जाती प्रमाणपत्राच्या आधारे जे काही शासकीय, निमशासकीय किंवा इतर लाभ मिळवले असतील ते सर्व लाभ कायदेशीररित्या अवैध ठरवून ते वसूलपात्र करण्यात आले आहे. जितेंद्र रणशूर यांचे अनुसूचित जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी, शिर्डी यांना तत्काळ जमा करून घेण्याचे आदेश देखील दिले आहे, असे तक्रारदार सागर आहेर यांनी सांगितले आहे.


