Health Camp : नगर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत ० ते १८ वर्षांतील बालकांच्या हृदयविकाराचे निदान, उपचार आणि मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे मोफत २डी इको तपासणी व हृदय शस्त्रक्रियेसाठी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली.
हेही वाचा : मुरुम वाहतुकीच्या वादातून घरात घुसून गोळीबार; मालुंजे येथील घटना
यांचे आयोजन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६२व्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश नरहरी चिवटे शिबिराला उपस्थित राहणार आहेत. यात शाळा व अंगणवाडी स्तरावरील आरोग्य तपासणीदरम्यान हृदयविकाराची लक्षणे आढळलेल्या बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
नक्की पहा : स्मार्ट मीटरच्या नावाखाली नागरिकांची लूट: बाळासाहेब बोराटे यांचा गंभीर आरोप
बालहृदयरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन (Health Camp)
ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे येथील बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल सराफ आणि डॉ. अभिजित नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली २डी इको तपासणी होणार असून, पात्र बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांची तपासणी करून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके), डीईआयसी कक्ष, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथील अधिकारी-कर्मचारी तसेच वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी समन्वयाने कार्यरत असल्याचे कळविण्यात आले आहे.



