
नगर : पाऊस सुरू (Rainy Season) झाला की, सगळ्यांना लोणावळा, महाबळेश्वर किंवा माळशेज घाट आठवतो, पण, तुम्ही कधी आपल्या अहिल्यानगरच्या जवळची पर्यटन ठिकाणे पहिले आहेत का? नगरच्या जवळची ही ५ पर्यटन स्थळे (Tourist spots Near Nagar City) नेमकी कोणती? जाणून घेऊ….
नक्की वाचा : बाप म्हणजे बाप असतो,पहिले कन्यादान आता किडनीदान; पाथर्डीत वडिलांनी मुलीला दिले नवजीवन
कोणती आहेत ही ५ पर्यटनस्थळे? (Tourist spots Near Nagar City)
१. चांदबीबी महल – हे ठिकाण तब्बल जमिनीपासून ३ हजार ८० फूट उंचीवर आहे. त्यामुळे माथेरान सारखेच वातावरण सध्या चांदबीबी महालाच्या परिसरात अनुभवता येते. नगर शहरापासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीतील गर्भगिरी रांगेत असलेल्या शहा डोंगरावर चांदबिबी महालाची अष्टकोनी चिरेबंदी ही वास्तू आहे. ३ मजली राजवाड्यासारखा याचा थाट आहे. विशेष बाब म्हणजे या महालाचे संपूर्ण बांधकाम हे दगडी बांधकाम आहे.

इमारतीला ठिकठिकाणी आकर्षक कमानी आहेत, ज्यामुळे वास्तूच्या आत हवा आणि प्रकाश खेळता राहतो. मंडळी या इमारतीची रचना अशी आहे की, आतमध्ये बोललेल्या शब्दांचा सुंदर प्रतिध्वनी तुम्हाला ऐकू येतो.पावसाळ्यात तर इथे जाण्याची मजाच काही और आहे. सगळीकडे हिरवळ दिसते. तुम्ही जर महालाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर असाल तर पावसाळ्यात पावसासोबत अंगावर वाऱ्याची येणारी झुळूक मनमोहून घेते. या दिवसांत अनेकदा संपूर्ण महाल धुक्यात हरवून जातो आणि थंड वारे इथे वाहतात. सायंकाळच्या वेळी इथला सनसेट बघण्यासाठी सुद्धा पर्यटकांची चांगलीच गर्दी असते. त्यामुळे या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते.
अवश्य वाचा : विद्यार्थ्यांना दिलासा; व्यवस्थापनाच्या वादामुळे रखडलेली शिक्षक भरती आता थेट होणार
२. डोंगरगण –

हे ठिकाण ही नगर शहरापासून अवघ्या काही अंतरावर आहे. निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकर्ससाठी तर हे पावसाळ्यातील हक्काचे ठिकाण आहे. पावसाळ्यात इथल्या टेकड्या हिरव्यागार होतात आणि छोटे-छोटे पाण्याचे झरे व धबधबे इथून वाहू लागतात. प्राचीन रामेश्वर मंदिरासाठी सुद्धा डोंगरगण हे प्रसिद्ध आहे. प्रभू श्रीरामांनी स्वतः इथे महादेवांची स्थापना असल्याचं सांगितलं जात. तसेच वनवास काळात सीतेच्या अंघोळीसाठी प्रभू श्रीराम यांनी याठिकाणी बाण मारून इथे गरम पाण्याचा झरा निर्माण केल्याची अख्यायिका सांगितली जाते. डोंगरगण परिसराच्या जवळच पिंपळगाव माळवी हा तलाव आहे. अगदी निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर आहे. पावसाळ्यात हा तलाव ओसंडून वाहत असतो.
३. कापूरवाडी तलाव – (Tourist spots Near Nagar City)
नगर शहराच्या अगदी जवळ असलेले एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणजे हा तलाव आहे. विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या तलावाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. स्थानिक नगरकरांसाठी हे एक उत्तम वीकेंड आणि मॉन्सून डेस्टिनेशन आहे. नगर-पाथर्डी रस्त्याने जात असताना साधारण ९-१० किमीवर डाव्या बाजूला कापूरवाडी गावाकडे जाण्यासाठी रस्ता लागतो. तिकडेच हा तलाव आहे. चांदबीबी महालाच्या अगदी जवळच हा तलाव स्थित आहे. हा तलाव डोंगराच्या कुशीत वसलेला आहे.
पावसाळ्यात तलाव परिसराच्या आजूबाजूच्या टेकड्या हिरव्यागार होतात, तेव्हा तलावाजवळील हिरवळीचा नजराणा पाहण्यासारखा असतो. हिवाळ्यात आणि पावसाळ्याच्या शेवटी या तलावावर अनेक स्थलांतरित पक्षी येतात. त्यामुळे पक्षीप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. मराठी कवी रेव्हरंड टिळक यांची समाधी देखील या तलावाच्या काठावर स्थित आहे. तसेच अहिल्यानगर मधील सर्वात शांत पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. त्यामुळे हा तलाव मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतो.
४. गोरक्षनाथ गड – गोरक्षनाथ गड हे अहिल्यानगर जवळील एक अत्यंत पवित्र, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य धार्मिक पर्यटन स्थळ आहे. नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी प्रमुख मानले जाणारे श्री गुरु गोरक्षनाथ यांच्या नावावरून या गडाला हे नाव पडले आहे. विशेषतः पावसाळ्यात या गडाचे रूप अतिशय विलोभनीय आणि सुंदर दिसते. नगर शहरापासून साधारण २५ ते ३० किलोमीटर अंतरावर हा गड आहे. हा गड प्रामुख्याने मांजरसुंबा गावाच्या परिसरात, वांबोरी घाटाच्या जवळ स्थित आहे.
नगर-मनमाड रस्त्याने जाताना मांजरसुंबा गावावरून गडाकडे रस्ता जातो. म्हणजेच तुम्ही जर गडावर येणार असाल तर तुम्ही मांजरसुंबा गड हे ऐतिहासिक वास्तू आणि वांबोरी घाटातला सुद्धा निसर्गरम्य नजारा पाहू शकता. ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. चढण फारशी अवघड नसल्याने सर्व वयोगटातील लोक सहज जाऊ शकतात. पावसाळ्यात हा संपूर्ण डोंगर हिरवाईने नटून जातो आणि डोंगरमाथ्यावर धुक्याची दुलई पाहायला मिळते.
५. मुळा धरण – मुळा धरण हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या धरणांपैकी एक आहे. हे धरण केवळ शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत नसून, पावसाळ्यात एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते. आणि हो तुम्ही एक दिवसात मस्त फिरून परत येऊ शकता असं हे ठिकाण आहे. अहिल्यानगर शहरापासून हे धरण साधारण ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण राहुरी तालुक्यात ‘बारागाव नांदूर’ गावाजवळ मुळा नदीवर बांधण्यात आले आहे. नगर-मनमाड महामार्गाने राहुरी गाठून तिथून धरणाकडे जाता येते. या धरणाच्या विस्तीर्ण जलाशयाला संत ज्ञानेश्वर माउलींच्या स्मरणार्थ ‘ज्ञानेश्वर सागर’ असे नाव देण्यात आले आहे.
पावसाळ्यात जेव्हा धरण पूर्ण भरते आणि त्याच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग केला जातो, तेव्हा पांढरेधोपट पाण्याचे प्रचंड लोट पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. धरणाचा विस्तीर्ण जलाशय, आजूबाजूला पसरलेली हिरवीगार झाडी आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण पिकनिकसाठी उत्तम मानले जाते. हिवाळ्यात आणि पावसाळ्याच्या उत्तरार्धात या विस्तीर्ण जलाशयाच्या परिसरात अनेक देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी येतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी आता भेट देऊ शकता. मात्र हो पावसाळ्यात धरणाच्या पाण्याच्या मुख्य प्रवाहा जवळ किंवा विसर्ग चालू असलेल्या ठिकाणी जाताना जलसंपदा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा आणि सुरक्षित अंतर राखून निसर्गाचा आनंद घ्या.


