
नगर : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशानुसार राज्यातील ग्रामपंचायत व नगरपरिषद हद्दीतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव (Stray Dogs in Ahilyanagar)कमी करण्यासाठी आता प्रभावी उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. या अंतर्गत नगरपालिका हद्दीत पालिका यंत्रणा, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतींची यंत्रणा भटके कुत्रे पकडून ते पशुसंवर्धन विभागाकडे (Animal Husbandry Department) सोपवणार आहेत. पशुसंवर्धन विभाग या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना पुन्हा संबंधित यंत्रणांच्या ताब्यात देणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे ५० हजार कुत्रे पकडून त्यांना जंतनाशक आणि रेबीजविरोधी लस देण्यासोबतच त्यांचे खच्चीकरण करून पुन्हा मूळ जागी सोडण्यात येणार आहे.
नक्की वाचा : सत्कारात नाव न पुकारल्याने तलाठ्याचा संताप; लोखंडी माईक डोक्यात घालून तरुणाला केले रक्तबंबाळ
भटके कुत्रे शेल्टर हाऊसमध्ये राहणार (Stray Dogs in Ahilyanagar)
सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. या मोहिमेत पकडलेले कुत्रे ४ ते ५ दिवस शेल्टर हाऊसमध्ये म्हणजे निवारा केंद्रामध्ये ठेवले जातील. तेथे पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर विशेष केंद्र उभारून या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करतील.
शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना जंतनाशक आणि त्यानंतर रेबीजविरोधी लस दिली जाईल. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस पशुसंवर्धन विभागाच्या देखरेखीखाली ठेवून हे कुत्रे पुन्हा पालिका किंवा ग्रामपंचायतींकडे सोपवले जातील.
अवश्य वाचा : समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
कुत्र्यांच्या उपचारासाठी नाशिक व नंदुरबार येथील संस्था निश्चित (Stray Dogs in Ahilyanagar)
जानेवारी महिन्यापासून जिल्हा परिषद आणि राज्य पशुसंवर्धन विभागाकडून याचे नियोजन सुरू होते. कुत्रे पकडणे आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी नाशिक व नंदुरबार येथील संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. शहरी भागांत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची जबाबदारी ही पालिकेची, तर ग्रामीण भागात ही जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली आहे. या दोन्ही यंत्रणांनी पकडलेल्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्याचे मुख्य काम पशुसंवर्धन विभाग सांभाळणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील काही शहरी भागात कुत्रे पकडून त्यांच्यावर खच्चीकरण करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. मात्र, आतापर्यंत किती कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झाली, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. या मोहिमेला गती देण्यासाठी जिल्ह्यात दक्षिण भागात दोन आणि उत्तर भागात दोन अशी एकूण चार शेल्टर हाऊस उभारण्यात येणार आहेत.
पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भाग मिळून सुमारे ४५ ते ५० हजार भटकी कुत्री असण्याचा अंदाज आहे. यामध्ये ग्रामपंचायत हद्दीत ३८ ते ४० हजार, तर उर्वरित १५ नगरपालिकांच्या हद्दीत सुमारे १० हजार कुत्र्यांचा समावेश आहे. कुत्र्यांमुळे त्रस्त अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या एकीकडे बिबट्याची दहशत, तर दुसरीकडे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट यामुळे नागरिक आणि शासकीय यंत्रणा हैराण झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल अडीच लाख नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात ही भटकी कुत्री बिबट्यासाठी सोपे भक्ष्य ठरत आहेत. यामुळे बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढल्याने नगरकर दुहेरी संकटात सापडले आहेत.


