Devendra Fadnavis : नगर: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या कथित राजीनाम्याच्या वृत्तानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेले नाही.
अवश्य वाचा: विद्यार्थांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला राजीनामा
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पातळीवर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. शनिवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यासह पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दिल्ली दौऱ्याबाबत अधिकृत माहिती नाही (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचल्याची माहिती समोर आली असली तरी त्यांची केंद्रीय नेतृत्वासोबत कोणत्या विषयावर बैठक होणार आहे किंवा या दौऱ्याचा उद्देश काय आहे, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
महाराष्ट्रातही आंदोलनाची पार्श्वभूमी (Devendra Fadnavis)
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर राज्यातही वातावरण तापले असून रविवारी मुंबईत आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीत गेल्याने त्यांच्या दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, दिल्लीतील अलीकडील घडामोडींनंतर केंद्र सरकारला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच त्याचे नेमके राजकीय महत्त्व स्पष्ट होईल.
अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया (Devendra Fadnavis)
गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जबाबदारी मिळू शकते, अशा चर्चाही सुरू आहेत. या चर्चांबाबत विचारले असता अमृता फडणवीस यांनी, “मला महाराष्ट्रातच राहायचं आहे. मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार,” असे सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या. पण केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून बोलावणे आल्याने त्यांच्यावर नवीन जबाबदारी पडते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.



