Tukaram Mundhe: मुंढेंच्या दूध भेसळविरोधी कारवाईला ब्रेक; उच्च न्यायालयाकडून अहिल्यानगरच्या ‘या’ दूध डेअरींना दिलासा

मुंढेंच्या दूध भेसळविरोधी कारवाईला ब्रेक

0
मुंढेंच्या दूध भेसळविरोधी कारवाईला ब्रेक
tukaram mundhe मुंढेंच्या दूध भेसळविरोधी कारवाईला ब्रेक

Tukaram Mundhe : नगर: राज्यभरात दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने सुरू केलेल्या धडक कारवायांना मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या निर्देशानुसार राज्यातील अनेक दूध डेअरींवर करण्यात आलेल्या परवाना निलंबनाच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. तपासणीनंतर संबंधित डेअरींना नियमांनुसार त्रुटी दूर करण्यासाठी 14 दिवसांची मुदत न देता थेट परवाने निलंबित करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला.

डेअरींचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले (Tukaram Mundhe)

एफडीएने अलीकडच्या काळात दूध भेसळ रोखण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान अनेक दूध संकलन केंद्रे आणि दूध प्रक्रिया करणाऱ्या डेअरींची तपासणी करण्यात आली. तपासणीत विविध प्रकारच्या त्रुटी आढळल्याचा दावा करत काही डेअरींचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले होते. या कारवाईविरोधात संबंधित डेअरी चालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

नक्की वाचा: नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील घटना

14 दिवसांची मुदत देणे आवश्यक (Tukaram Mundhe)

याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की, अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच एफडीएच्या प्रचलित नियमांनुसार तपासणीत त्रुटी आढळल्यास संबंधित व्यावसायिकाला त्या दूर करण्यासाठी 14 दिवसांची मुदत देणे आवश्यक आहे. ही संधी न देता थेट परवाने निलंबित करणे कायद्याच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे. त्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर ठरवून तिला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

परवाना निलंबनाच्या कारवाईला अंतरिम स्थगिती (Tukaram Mundhe)

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रथमदर्शनी याचिकाकर्त्यांचा मुद्दा ग्राह्य धरत परवाना निलंबनाच्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली. यामुळे संबंधित डेअरींना तात्पुरता दिलासा मिळाला असून पुढील सुनावणीपर्यंत एफडीएच्या निलंबनाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही.

हेही वाचा: भगवानगडावर आषाढी एकादशीला भक्तांचा महासागर; विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पहाटेपासून रांगा

अहिल्यानगरमधील डेअरींना दिलासा (Tukaram Mundhe)

या आदेशामुळे सर्वाधिक दिलासा अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पाच डेअरींना मिळाला आहे. त्यामध्ये कृष्णानंद फूड प्रॉडक्ट, जतिन दूध संकलन, जयहरी दूध संकलन, सिद्धेश्वर मिल्क प्रॉडक्ट आणि नवनाथ दूध संकलन यांचा समावेश आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील शिवकृपा डेअरी, जळगाव येथील सरस्वती मिल्क प्रॉडक्ट आणि जालना येथील सरस्वती मिल्क प्रॉडक्ट यांच्या परवाना निलंबनाच्या कारवाईलाही स्थगिती मिळाली आहे.

नक्की वाचा: जंतरमंतरवरील आंदोलन सफल; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह प्रमुख मागण्या मान्य

दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयामुळे एफडीएच्या दूध भेसळविरोधी मोहिमेवर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ही स्थगिती अंतिम निर्णय नसून केवळ अंतरिम स्वरूपाची आहे. पुढील सुनावणीत न्यायालयाकडून या प्रकरणावर सविस्तर निर्णय होणार असून एफडीएची कारवाई नियमबाह्य होती का, यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. राज्यात दूध भेसळीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या या आदेशाकडे अन्न सुरक्षा क्षेत्रासह डेअरी उद्योगाचेही लक्ष लागले आहे.