Plastic Ban : अहिल्यानगर : शहर प्लास्टिकमुक्त, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर महानगरपालिकेने (ahilyanagar municiple corporation) ‘सिंगल युज’ (single use plastic ban) प्लास्टिकविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाने गेल्या महिनाभरात शहरातील विविध भागांत तपासणी मोहीम राबवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. या मोहिमेत 365 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, विविध प्रकरणांत एकूण 55 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : मंत्रिमंडळात घेतला अहिल्यानगरसाठी महत्वाचा निर्णय; इतर महत्त्वाचे निर्णयही घेतले
महापालिकेने कारवाईची तीव्रता वाढवली (Plastic Ban)
राज्य शासनाने एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी लागू केली असली, तरी शहरातील काही व्यापारी, दुकानदार आणि भाजी विक्रेते अद्यापही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करत असल्याचे तपासणीत आढळून आले. यामुळे महापालिकेने अशा व्यावसायिकांवर कारवाईची तीव्रता वाढवली असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
प्लास्टिकपुरती कारवाई मर्यादित नाही (Plastic Ban)
महापालिकेची कारवाई केवळ प्लास्टिकपुरती मर्यादित नसून, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे, घंटागाडीऐवजी रस्त्यावरच कचऱ्याची विल्हेवाट लावणारे तसेच मनपाची परवानगी न घेता रस्ते खोदून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे. शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांचे संरक्षण करण्यासाठी ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ही मोहीम मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रशांत रामदीन यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, सुरेश वाघ, ऋषिकेश भालेराव, ऋषिकेश वाल्मीक, संदीप चव्हाण, प्रसाद उमाप, प्रशांत चांदणे, राजेंद्र सामन आणि शुभम उपलंची यांच्या पथकाने विविध भागांत धाडी टाकून ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली.
महापालिकेचे स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
महापालिकेने नागरिकांनाही स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. घरगुती आणि व्यावसायिक कचरा केवळ घंटागाडीतच टाकावा, सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नये आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परवानगीशिवाय रस्ते खोदणे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आढळल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
हेही वाचा: अहिल्यानगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसाठी मुंबईत बैठक
कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन
महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी प्लास्टिकमुक्त शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होत आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि भाजी विक्रेत्यांनी प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. शहराच्या स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.



