
Nahata : नगर : श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्या अटकेनंतर श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ‘नाहाटा पॅटर्न’ चर्चेचा विषय ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे यांची त्यांच्या निवासस्थानी घेतलेली भेटही विविध राजकीय चर्चांना कारणीभूत ठरली आहे. या भेटीमागील राजकीय संदेश काय, याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
नक्की वाचा : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मका-मायकोरायझा इनक्युबेशन साधनाला डिझाइन पेटंट प्राप्त
पाचपुते-नागवडे एकत्र
राजकीय जाणकारांच्या मते, बाळासाहेब नाहाटा सक्रिय न राहिल्यास जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्यादृष्टीने पाचपुते आणि नागवडे यांच्यासाठी राजकीय समीकरणे अधिक अनुकूल ठरू शकतात. त्यामुळे या घडामोडींचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्रीगोंद्याच्या राजकारणात कायम पारंपरिक विरोधक राहिलेले पाचपुते आणि नागवडे कुटुंब जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आल्याने माजी आमदार राहुल जगताप यांची अडचण होऊ शकते. पाचपुते आणि नागवडे कुटुंब एकत्र आलेले दोन्हीकडील समर्थकांना रुचलेले दिसत नाही.
नक्की पहा : हवामानाचे अभ्यासक पंजाब डख यांनी पारनेरमधून वर्तवला अहिल्यानगर जिल्ह्याच्या हवामानाचा अंदाज
जिल्हा बँक निवडणुकीत प्रभाव (Nahata)
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी नुकत्याच पार पडलेल्या ठराव प्रक्रियेकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. मतदार यादीकडे पाहता नाहाटा यांच्याशी उघडपणे किंवा पडद्यामागून राजकीय जवळीक असलेले मतदार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या गणितात त्यांचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. त्यामुळे पाचपुते व नागवडे यांच्या बाजूने सोसायटी ठरावांची गोळाबेरीज जुळत असली तरीही ऐनवेळी निवडणूक फिरवणाऱ्या नाहाटा यांच्या अटकेनंतर तालुक्यासह जिल्ह्यात आणखी एक चर्चा रंगताना दिसत आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या महत्त्वाच्या कालावधीत बाळासाहेब नाहाटा यांना तालुक्याच्या राजकारणात सक्रिय राहता येऊ नये, यासाठी काही हालचाली झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. मात्र, या दाव्याला अधिकृत पुष्टी झालेली नाही. बाळासाहेब नाहाटा यांचे पुत्र मितेश नाहाटा यांची राज्य जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी झालेली नियुक्तीही नाहाटा कुटुंबाच्या राजकीय वजनाची चर्चा अधिक गडद करणारी ठरत आहे.
श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात बाळासाहेब नाहाटा यांना निवडणुकीची गणिते बदलण्याची क्षमता असलेले नेते म्हणून अनेकजण पाहतात. मतदारांशी असलेले वैयक्तिक संबंध, सहकार क्षेत्रातील मजबूत नेटवर्क आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव यांचा प्रभावी मेळ घालण्याची त्यांची शैलीच ‘नाहाटा पॅटर्न’ म्हणून ओळखली जाते, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत प्रस्थापित राजकीय गटांना या पॅटर्नची धास्ती असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. आता या सर्व घडामोडींमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेमकी कोणती नवी राजकीय समीकरणे आकार घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


