Earthquake : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुक्यात हादरे; सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

0
Earthquake : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुक्यात हादरे; घाबरू नका, सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
Earthquake : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुक्यात हादरे; घाबरू नका, सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Earthquake : नगर : नाशिक जिल्ह्यात काल (ता. ८) रात्री भूकंपाचा धक्का जाणवला असून, याचे सौम्य हादरे शेजारील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यातील काही गावांमध्येही नागरिकांना बसले आहेत. या अचानक बसलेल्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्ह्यातील तमाम नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच भूकंपाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

नक्की वाचा : अखेर जखमी महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; तीन दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली

आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती

आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंप ही पूर्वसूचना न देता येणारी आपत्ती असल्याने नागरिकांनी पूर्वद दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः जुनाट, मोडकळीस आलेल्या किंवा दगड-मातीच्या कच्च्या बांधकामाच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. घराला हादरे बसल्यास तात्काळ व सुरक्षितपणे बाहेर पडावे. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी आपल्या घरांची नियमित पाहणी करून भिंतींचे तडे बुजवून मजबुतीकरण करावे. लोडबेअरिंग घर बांधताना प्रत्येक खोलीच्या चारही कोपऱ्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी सलोह काँक्रीट वापरून प्लिंथ, लिंटेल व रूफ बँडमध्ये योग्य सांधणी करावी. याशिवाय घरातील अवजड आणि मोठ्या वस्तू उंच जागेवर न ठेवता जमिनीलगत ठेवाव्यात, कपाटे व फ्रेम्स भिंतीवर व्यवस्थित बसवून घ्याव्यात आणि सुरक्षित बाहेर पडण्याचे मार्ग सर्वांनी समजून घ्यावेत.

हेही पहा : रस्त्यात खड्डे की खड्डयात रास्ता; शाळकरी मुलींचा व्हिडीओ व्हायरल

भूकंपाचा धक्का बसत असताना ‘हे’ करा… (Earthquake)

भूकंपाचा धक्का बसत असताना नागरिकांनी स्वतः शांत राहून इतरांनाही धीर द्यावा. घरात असल्यास लिफ्टचा वापर न करता मजबूत टेबल किंवा पलंगाखाली बसून स्वतःचा बचाव करावा. तसेच दाराजवळ गर्दी न करता भिंती, आरसे, फर्निचर व दिव्यांपासून दूर राहावे आणि डोक्याला इजा होऊ नये म्हणून चादर, उशी किंवा कपड्याची घडी डोक्यावर धरावी. जर तुम्ही रस्त्यावर असाल तर घाईगडबड न करता मोकळ्या जागेत जावे आणि उंच जुन्या इमारती, भिंती व विजेच्या तारांपासून लांब राहावे. वाहन चालवत असल्यास गाडी जुन्या इमारती आणि विजेच्या खांबांपासून दूर नेऊन सुरक्षित ठिकाणी थांबवावी.

भूकंपानंतर अनेकदा जमिनीला भेगा पडल्याच्या किंवा इतर चुकीच्या अफवा पसरतात, त्यावर खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवू नये. मुख्य धक्क्यानंतर पुन्हा छोटे धक्के बसण्याची शक्यता असल्याने गॅस, वीज व पाणी कनेक्शन बंद ठेवावेत. गॅस गळती किंवा शॉर्टसर्किटच्या धोक्यामुळे काडी पेटवणे वा विजेचे बटन चालू करणे टाळावे. ज्या इमारतींना मोठे तडे गेले आहेत तिथे राहणे टाळावे, दूषित पाणी पिऊ नये आणि ढिगाऱ्याखाली कोणी दबले असल्यास तात्काळ मदत पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.