
ससेवाडीत खडी क्रेशरविरोधात ग्रामस्थ आक्रमक; प्रशासनाच्या भूमिकेवर संताप
Villagers strongly oppose stone crusher : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील ससेवाडी (Sasewadi) येथे प्रस्तावित खडी क्रेशर (Villagers strongly oppose stone crusher) प्लांटवरून ग्रामस्थ आणि प्रशासन आमनेसामने आले आहेत. गावाच्या शेती, पर्यावरण आणि वन्यजीवांवर विपरीत परिणाम होण्याची भीती (Fear of adverse effects on wildlife) व्यक्त करत ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. ग्रामपंचायतीनेही विरोधाचा ठराव घेतला असताना विविध विभागांकडून परवानग्या दिल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. क्रेशरला अंतिम परवानगी दिल्यास रस्ता रोको आंदोलन (Road blockade protest) करून सामूहिक आत्मदहन करू, असा संतप्त इशारा विशेष ग्रामसभेत देण्यात आला.
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
ससेवाडी येथे झालेल्या विशेष ग्रामसभेला प्रांताधिकारी सुधीर पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नामदेव ससे, भीवाजी ससे, अरुण जरे, भाना मगर, जनार्दन ससे, रावसाहेब ससे, शंकर बळे, वसंत आठरे, रामदास मगर, सचिन जरे, लहू आठरे, सोन्याबापू आठरे, बाळासाहेब ससे, संजय ससे, राजू ससे, दत्तू जरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रस्तावित खडी क्रेशरच्या परवानगीबाबत ग्रामस्थांची भूमिका जाणून घेण्यात आली. वन विभाग, भूजल विभाग आणि प्रदूषण विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्रे मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, ग्रामपंचायतीचा निर्णय अद्याप बाकी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. क्रेशर उभारण्यास समर्थन करणाऱ्यांनी हात वर करावेत, असे आवाहन करण्यात आले; मात्र एकही हात वर न झाल्याने ग्रामस्थांनी आपला ठाम विरोध स्पष्ट केला.

ग्रामपंचायतीने वन विभाग, भूजल विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला यापूर्वीच पत्र देऊन क्रेशरला विरोध दर्शविला होता. तरीही संबंधित विभागांकडून परवानग्या देण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रकल्पाला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये, अशी मागणी करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
क्रेशरमुळे शेती आणि आरोग्य धोक्यात (Villagers strongly oppose stone crusher)
अहिल्यानगर तालुक्यातील कापूरवाडी, वारूळवाडी आणि पोखर्डी परिसरात सुरू असलेल्या खडी क्रेशरमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. धूळ, ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे नागरिकांचे जगणे त्रस्त झाल्याचे त्यांनी सांगितले. ससेवाडीतील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असून क्रेशर सुरू झाल्यास शेतीचे नुकसान होण्याबरोबरच अनेक कुटुंबांच्या जीवनमानावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

वन्यजीवांच्या अस्तित्वावरही प्रश्न
ससेवाडी परिसरात वन्यजीवांचा वावर असताना ‘या भागात वन्यजीव नाहीत’ या कारणावरून वन विभागाने परवानगी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. एका शेतकऱ्याने उन्हाळ्यातही वन्यप्राण्यांसाठी शेतात पाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. त्यामुळे परिसरात वन्यजीव नसल्याचा दावा चुकीचा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, गेल्या उन्हाळ्यात वन विभागानेच वन्यप्राण्यांसाठी पानवठे तयार करून त्यात पाणी सोडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले होते. मग त्याच परिसरात वन्यजीव नाहीत, असे सांगून क्रेशरला परवानगी कशी दिली जाते, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.


