Hiten Tejwani : छोट्या पडद्याच्या माध्यमातून घरोघरी लोकप्रिय झालेले हितेन तेजवानी (Hiten Tejwani) यांनी साकारलेल्या विविध व्यक्तिरेखांनी रसिकांचे अतोनात प्रेम मिळवलं आहे. आजवर हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिकांत झळकलेले हितेन तेजवानी मराठी सिनेसृष्टीत (Marathi film industry) दाखल होणार आहेत. ‘लाईव्ह’ या आगामी मराठी चित्रपटाने (‘Live’ Marathi movie) हितेन तेजवानी यांना मराठीत आणण्याची किमया साधली आहे. या चित्रपटात हितेन यांचं आजवर कधीही न पाहिलेलं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘लाईव्ह’मधील हितेन यांची व्यक्तिरेखा त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे.
चित्रपट आजच्या काळातील घटनांवर आधारलेला
निर्माते सुमित पांडे रिद्धी बिद्दी व्हिजन्स या बॅनरखाली ‘लाईव्ह’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. छबी असीम हल्दर या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून, लेखन-दिग्दर्शन संजीव राय यांचं आहे. या चित्रपटात हितेन तेजवानी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. ‘सुकन्या’, ‘घर एक मंदिर’, ‘कुटुंब’, ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’, ‘कुसुम’, ‘केसर’ आदी गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये हितेन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे. याखेरीज ‘कृष्णा कॅाटेज’, ‘जॅागर्स पार्क’, ‘अन्वर’, ‘अनकही’, ‘मानो या ना मानो’ या बहुचर्चित चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक संजीव राय यांच्याबरोबर हितेन यांनी ‘टेस्ला टूकी’च्या जाहिरातीसह ‘फातिमा’ ही वेबसीरिज केली आहे, जी रिलायन्स एंटरटेनमेंटवर स्ट्रीम झाली होती.
‘लाईव्ह’ या चित्रपटाच्या निमित्ताने हितेन प्रथमच मराठी चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात हितेन यांनी आलम नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. हितेन यांनी ‘लाईव्ह’बाबत आपलं मत व्यक्त केलं. हितेन म्हणाले की, ‘लाईव्ह’ हा माझा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने खूप उत्सुक असून, मराठी सहकलाकारांसोबत काम करताना खूप मजा येत आहे. ‘लाईव्ह’चं चित्रीकरण नुकेतच पूर्ण झाले आहे. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल, तेव्हा नक्कीच खूप मोठा धमाका करेल. हा माझा पहिला मराठी चित्रपट असल्याने कृपया प्रेक्षकांनी माझं काम पाहून प्रतिक्रिया द्यावी. भविष्यात आणखी मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी उत्साह वाढवावा. हा चित्रपट आपल्याला कसा वाटला हे सुद्धा सांगावं, कारण हा चित्रपट आजच्या काळातील घटनांवर आधारलेला आहे. आज आपल्या आसपास काय-काय लाईव्ह सुरू आहे आणि त्यामुळे काय होतं हे लोकांना माहित नसतं. त्याबद्दलचा घटनाक्रम आणि विषय या चित्रपटात पाहायला मिळेल. ‘लाईव्ह’बाबत जास्त काही सांगू शकणार नाही, पण हा चित्रपट पाहा आणि एन्जॅाय करण्याचं आवाहन हितेन यांनी केलं आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
महत्त्वकांक्षी तरुणीभोवती फिरणारी प्रेरणादायी कथा
या चित्रपटात मिलिंद गुणाजी, अनंत जोग, निशिगंधा वाड, रूपाली जाधव, हितेन तेजवानी, सागर काळे, अनिल नागरथ, नम्रता जाधव, विनय राजपूत आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. एका महत्त्वकांक्षी तरुणीभोवती फिरणारी प्रेरणादायी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
नायिकेच्या संघर्ष आणि न्याय-हक्काच्या लढाईची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या ‘लाईव्ह’च्या निमित्ताने समाजातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर वर्तमानात घडणाऱ्या काही संवेदनशील आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनांचा वेधही यात घेण्यात येणार आहे. समाजातील वास्तव चित्र दाखवणाऱ्या ‘लाईव्ह’चे संवाद लेखन दिग्दर्शक संजीव राय आणि पूनम विभूते यांनी केलं आहे. महालिंग कंठाळे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार दिनेश अर्जुना आणि अमन श्लोक यांनी संगीतसाज चढवला आहे. डिओपी गोपी यांच्या कल्पक सिनेमॅटोग्राफीद्वारे हा चित्रपट पाहायला मिळणार असून, कला दिग्दर्शन सैफुद्दीन शेख यांनी केलं आहे.



