District Co-operative Bank Election : जिल्हा बँकेच्या राजकारणात ट्विस्ट; राम शिंदेंनी ब्रेक घेताच खासदार लंकेंची बँक निवडणुकीत उडी

0
जिल्हा बँकेच्या राजकारणात ट्विस्ट; राम शिंदेंनी ब्रेक घेताच खासदार लंकेंची बँक निवडणुकीत उडी
जिल्हा बँकेच्या राजकारणात ट्विस्ट; राम शिंदेंनी ब्रेक घेताच खासदार लंकेंची बँक निवडणुकीत उडी

District Co-operative Bank Election : नगर : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही महिन्यांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नेत्यांच्या गाठीभेटी घेणारे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे अलीकडे काहीसे शांत झाल्याचे चित्र होते. मात्र, आता खासदार निलेश लंके यांनीच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिल्याने राजकीय समीकरणांना नवा ट्विस्ट मिळाला आहे. जिल्हा बँकेच्या वार्षिक अहवालात फोटो न छापल्याने नाराज झाल्याची चर्चा असलेल्या राम शिंदे यांनी गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. विखे पिता-पुत्रांना शह देण्यासाठी त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीत सक्रिय भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, अलीकडच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे यांनीही भेटीगाठी वाढवत निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे दिसून आले. त्यानंतर शिंदे यांची सक्रियता काहीशी कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले.

कोपरगावातून पळवून नेलेल्या १२ वर्षीय मुलीची अहिल्यानगरमधून सुखरूप सुटका; स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन आरोपींना अटक

खासदार लंकेचा विखेंवर निशाणा (District Co-operative Bank Election)

पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री कोरठण खंडोबा देवस्थान परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण खासदार लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना लंकेंनी जिल्हा बँक निवडणुकीत उतरणार असल्याचे सूतोवाच केल्याने जिल्ह्यातील राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कार्क्रमात बोलताना लंके यांनी विखेंवर जोरदार निशाणा साधत नाव न घेता टीका केली. “तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने आणि लोकं असली तरी तुम्ही कितीही अंत पाहण्याचा प्रयत्न करा, निलेश लंके तुम्हाला पुरून उरणार आहे. राजकारणात तुमचा शेवट केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे खंडेरायाच्या चरणी सांगतो. बाह्यशक्ती असो अथवा आंतरशक्ती कोणतीही शक्ती आली, तरी मी सामोरे जाण्यास तयार आहे. आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लंके जिल्हा बँकेत जाणारच,” असा निर्धार खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.

नक्की पहा : तुकाराम मुंढेंचा दणका! पण खिशाला चटका? अन्न सुरक्षित की महाग? FDA च्या कारवाईचा दुसरा चेहरा

विखे पिता-पुत्र सक्रिय (District Co-operative Bank Election)

जिल्हा बँकेच्या राजकारणात आजवर साखर कारखानदार आणि प्रस्थापित राजकीय घराण्यांचे वर्चस्व राहिले आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य कार्यकर्त्यालाही जिल्हा बँकेच्या संचालकपदापर्यंत पोहोचता येऊ शकते, असा संदेश देण्याचा प्रयत्न राम शिंदे यांच्या भूमिकेतून झाल्याची चर्चा होती. मात्र, त्याला भाजपांतर्गत दुफळीची हवा मिळाल्याने राम शिंदे एवढ्यात काहीसे शांत झाल्याचे दिसून येत आहे. विखेंना जिल्ह्यात भाजपांतर्गत विरोधाचा सामना करावा लागत असल्याने ही निवडणूक काहीशी चुरशीची होईल, असे वाटत असतानाच राम शिंदे अचानक शांत झाल्याने ही निवडणूक बिनविरोधच्या दिशेने जाताना दिसत होती. त्याला महत्वाचे कारण म्हणजे विखे पिता-पुत्रांनी अलीकडेच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची घेतलेली भेट. एकेकाळी राजकीय वैरी असलेल्या गडाख यांची विखेंनी घेतलेली भेट ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीची बिनविरोध होण्याची नांदी असल्याचे बोलले जात होते. दुसरीकडे राम शिंदे यांना अनिच्छेने शांत बसावे लागत असल्याची चर्चा आहे.

पहा : रस्त्याच्या मधोमध बसून गडकरींना फोन; कोपरगावात अनोखी गांधीगिरी

राम शिंदेंसाठी लंके धावले? (District Co-operative Bank Election)

राम शिंदेंची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे एकेकाळचे मित्र खासदार निलेश लंके धावून आल्याचे जाणकार सांगत आहेत. कारण २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोघांनी एकाच गाडीतून केलेला प्रवास सर्वश्रुत आहे. राम शिंदे यांनी लंके यांना लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात मदत केल्याचे अनेकजण सांगतात. त्यामुळे एकीकडे एवढ्या दिवस काहीसे शांत असलेले खासदार लंके अचानक जिल्हा बँक निवडणुकीत रस घेतात आणि विखेंविरोधात दंड थोपटतात, हे देखील आश्चर्यकारक म्हणावे लागेल. सध्या राम शिंदेंचे जिल्हा बँक निवडणुकीपासून दूर जाणे आणि खासदार लंके यांनी यात एंट्री घेणे, यामागील टायमिंगची चर्चा मात्र जिल्हाभरात रंगली आहे. विखे पिता-पुत्रांच्या बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना लंके यांच्या एंट्रीमुळे कितपत धक्का बसतो आणि आगामी काळात कोणते नवे राजकीय समीकरण आकाराला येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.