
District Co-operative Bank Election : नगर : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. वार्षिक अहवालात फोटो न छापल्याने नाराज झालेल्या विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी गेल्या काही महिन्यांत जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला होता. विखेंना शह देण्यासाठी सभापती शिंदे यांनी या निवडणुकीत रस घेतल्याचे बोलले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांत विखे पिता-पुत्रांनीही भेटीगाठी वाढवत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु करताच राम शिंदे हे काहीसे शांत झाल्याचे दिसून आले. मात्र आता खासदार निलेश लंके यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने जिल्हा बँकेच्या राजकारणात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे.
खासदार लंकेचा विखेंवर निशाणा
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री कोरठण खंडोबा देवस्थान परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण खासदार लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना लंकेंनी जिल्हा बँक निवडणुकीत उतरणार असल्याचे सूतोवाच केल्याने जिल्ह्यातील राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कार्क्रमात बोलताना लंके यांनी विखेंवर जोरदार निशाणा साधत नाव न घेता टीका केली. “तुमच्याकडे कितीही शिक्षण संस्था, कारखाने आणि लोकं असली तरी तुम्ही कितीही अंत पाहण्याचा प्रयत्न करा, निलेश लंके तुम्हाला पुरून उरणार आहे. राजकारणात तुमचा शेवट केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे खंडेरायाच्या चरणी सांगतो. बाह्यशक्ती असो अथवा आंतरशक्ती कोणतीही शक्ती आली, तरी मी सामोरे जाण्यास तयार आहे. आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लंके जिल्हा बँकेत जाणारच,” असा निर्धार खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
नक्की पहा : तुकाराम मुंढेंचा दणका! पण खिशाला चटका? अन्न सुरक्षित की महाग? FDA च्या कारवाईचा दुसरा चेहरा
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेतील आजवरचा इतिहास बघता साखर कारखानदारांच्या घरातील व्यक्ती सोडून इतर सामान्यही संचालक जावू शकतात, हा संदेश देण्याचा प्रयत्न राम शिंदे यांचा होता. मात्र, त्याला भाजपांतर्गत दुफळीची हवा मिळाल्याने राम शिंदे एवढ्यात काहीसे शांत झाल्याचे दिसून येत आहे. विखेंना जिल्ह्यात भाजपांतर्गत विरोधाचा सामना करावा लागत असल्याने ही निवडणूक काहीशी चुरशीची होईल, असे वाटत असतानाच राम शिंदे अचानक शांत झाल्याने ही निवडणूक बिनविरोधच्या दिशेने जाताना दिसत होती. त्याला महत्वाचे कारण म्हणजे विखे पिता-पुत्रांनी अलीकडेच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची घेतलेली भेट. एकेकाळी राजकीय वैरी असलेल्या गडाख यांची विखेंनी घेतलेली भेट ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीची बिनविरोध होण्याची नांदी असल्याचे बोलले जात होते. दुसरीकडे राम शिंदे यांना अनिच्छेने शांत बसावे लागत असल्याची चर्चा आहे.
राम शिंदेंसाठी लंके धावले? (District Co-operative Bank Election)
राम शिंदेंची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे एकेकाळचे मित्र खासदार निलेश लंके धावून आल्याचे जाणकार सांगत आहेत. कारण २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या दोघांनी एकाच गाडीतून केलेला प्रवास सर्वश्रुत आहे. राम शिंदे यांनी लंके यांना लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात मदत केल्याचे अनेकजण सांगतात. त्यामुळे एकीकडे एवढ्या दिवस काहीसे शांत असलेले खासदार लंके अचानक जिल्हा बँक निवडणुकीत रस घेतात आणि विखेंविरोधात दंड थोपटतात, हे देखील आश्चर्यकारक म्हणावे लागेल. सध्या राम शिंदेंचे जिल्हा बँक निवडणुकीपासून दूर जाणे आणि खासदार लंके यांनी यात एंट्री घेणे, यामागील टायमिंगची चर्चा मात्र जिल्हाभरात रंगली आहे.


