Obscene Banner : श्रीगोंदा : शहरातील दौंड-जामखेड महामार्गाच्या कडेला लावण्यात आलेल्या चित्रपटाच्या अश्लील आणि आक्षेपार्ह बॅनरमुळे (Obscene Banner) शहरात तीव्र संताप पसरला होता. सोशल मीडियावर (Social media) या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत हे बॅनर काढून घेतले आहेत. या कारवाईनंतर आता नगरपरिषद प्रशासन (Municipal Council Administration) संबंधित थिएटर व बॅनर लावणाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नक्की वाचा : महाडीबीटीसाठी विद्यार्थ्यांना महाआयडी बंधनकारक
नागरिकांसह पालकांमध्ये तीव्र असंतोष
दौंड-जामखेड महामार्गासह शहरात ठिकठिकाणी चित्रपटाचे मोठे बॅनर उभारण्यात आले होते. विशेषतः कॉलेज परिसरातील मोक्याच्या ठिकाणी लावलेल्या बॅनरवर अत्यंत अश्लील फोटो छापण्यात आले होते. कॉलेज परिसरात दररोज हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींची वर्दळ असते. अशा संवेदनशील आणि मुख्य महामार्गाच्या कडेला उघड्यावर अश्लील बॅनर लावल्याने शहरातील सामाजिक व शैक्षणिक वातावरणाला गालबोट लागत होते. यामुळे नागरिकांसह पालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत (Obscene Banner)
सोशल मीडियावर या बॅनरचे फोटो व्हायरल होऊन नागरिकांचा संताप वाढू लागल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले. पोलीस पथकाने महामार्गावर तसेच शहरातील विविध भागात जाऊन हे अश्लील बॅनर तत्काळ हटवले. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे नागरिक व पालकांनी स्वागत केले असून, पोलिसांनी बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी बॅनर हटवले असले तरी असे अश्लील फलक लावण्यासाठी नगर परिषदेची रीतसर परवानगी घेतली होती का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
परवानगी नसेल तर नगर परिषद प्रशासन संबंधितावर कायदेशीर कारवाई करणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. याप्रकरणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



