MahaDBT Scholarship : महाडीबीटीसाठी विद्यार्थ्यांना महाआयडी बंधनकारक

नवीन अर्ज तसेच नूतनीकरणाच्या अर्जासाठीही नवीन महाआयडी आणि आधार लॉगिन करावे लागणार

0
MahaDBT Scholarship : महाडीबीटीसाठी विद्यार्थ्यांना महाआयडी बंधनकारक
MahaDBT Scholarship : महाडीबीटीसाठी विद्यार्थ्यांना महाआयडी बंधनकारक

MahaDBT Scholarship : नगर : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (Government of India Post-Matric Scholarship), शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप), राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आदी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून महाडीबीटी २.० या नवीन प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून महाडीबीटीसाठी (MahaDBT Scholarship) विद्यार्थ्यांना महाआयडी (MahaID) बंधनकारक करण्यात आले आहे.

नक्की वाचा : डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उद्या ‘शेतकरी दिन’ होणार साजरा

नवीन महाआयडी तयार करणे आवश्यक

या प्रणालीवर अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम नवीन महाआयडी (MahalD) तयार करणे आवश्यक असून, जुन्या पोर्टलवरील आयडी व पासवर्ड यापुढे ग्राह्य राहणार नाहीत. विद्यार्थ्यांनी आपल्या आधार क्रमांकाचा वापर करून नवीन महाआयडी तयार करणे आवश्यक आहे. आधार पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अचूक व अद्ययावत असणे आवश्यक आहे. नवीन अर्ज तसेच नूतनीकरणाच्या अर्जासाठीही नवीन महाआयडी आणि आधार लॉगिन करावे लागणार आहे. नूतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्यानंतर ‘माझा अर्ज नूतनीकरण करायचा’ हा पर्याय निवडावा. अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्पष्ट व वाचनीय पीडीएफ (PDF) स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना कागदपत्रांची पूर्तता आणि आधारवरील माहितीची अचूकता तपासूनच अर्ज सादर करावा.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचे आवाहन (MahaDBT Scholarship)

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ व त्यापूर्वीच्या वर्षातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, फ्रीशिप व राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज वारंवार सूचना देऊनही विद्यार्थी आणि महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. त्यामुळे महाविद्यालयांनी प्रलंबित अर्जाची तातडीने तपासणी करून त्रुटी असल्यास संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्या दूर कराव्यात. परिपूर्ण अर्ज ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत जिल्हा कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्जाची पूर्तता करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहणार आहे.

तसेच २०२६-२७ वर्षामधील अर्ज भरण्याची सुविधादेखील सुरू करण्यात आलेली आहे. २०२६-२७ मध्ये मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या सर्व अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.