Irrigation development in Ahilyanagar : अहिल्यानगरच्या दुष्काळमुक्तीच्या दिशेने मोठं पाऊल; मंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर जिल्ह्याच्या सिंचन विकासाला गती

0
दुष्काळमुक्तीच्या दिशेने मोठं पाऊल; अहिल्यानगर जिल्ह्याच्या सिंचन विकासाला गती
दुष्काळमुक्तीच्या दिशेने मोठं पाऊल; अहिल्यानगर जिल्ह्याच्या सिंचन विकासाला गती

Irrigation development in Ahilyanagar : नगर : वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जलसमृद्धीच्या दिशेने महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. महायुती सरकारच्या काळात जिल्ह्यातील रखडलेल्या आणि महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरीसोबतच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना गती मिळत असल्याचे सांगितले जात आहे. यातील सर्वात मोठी बाब म्हणजे कुकडी प्रकल्पासाठी तब्बल ५ हजार ७०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कुकडी प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे आणि पिंपळगाव जोगे या पाच धरणांचा समावेश आहे. या प्रकल्पातून अहिल्यानगरसह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.

डीजेविरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

दक्षिण-उत्तर अहिल्यानगरला फायदा

याच प्रकल्पातील महत्त्वाचा घटक असलेल्या डिंभे-माणिकडोह बोगद्यामुळे कर्जत-जामखेड, श्रीगोंदा, पारनेर या दुष्काळी भागातील पाणी उपलब्धतेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. दक्षिण अहिल्यानगरसाठी ही मोठी बातमी आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३२ दुष्काळी गावांसाठी साकळाई उपसा सिंचन योजनेला १ हजार २३४ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर उत्तर अहिल्यानगरसाठी जीवनदायी ठरलेल्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांच्या कामांनाही गती देण्यात आली आहे. धरण पूर्ण होऊनही अनेक वर्षे कालव्यांची कामे रखडली होती. आता या कामांना निधी मिळाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ही आशादायी बाब आहे.

कालव्यांची दुरुस्ती आणि सुधारणांसाठीही तरतूद (Irrigation development in Ahilyanagar)

याचबरोबर जिल्ह्यातील जुन्या कालव्यांच्या दुरुस्ती आणि सुधारणांसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. गोदावरी-कुकडी तसेच प्रवरा डावा आणि उजवा कालव्यांसाठी जवळपास ९९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुळा धरणाच्या उच्चस्तरीय उजवा कालवा-वांबोरी चारीसाठीही निधी मंजूर झाला असून, या कामामुळे सुमारे ३ हजार ५६८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. संगमनेर तालुक्यातील भोजापूर पूरचारीचा दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भोजापूर लाभक्षेत्रातील ३५ जलसाठे तलाव भरण्यासाठी पाण्याची उपलब्धता होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0aGeographic

एकीकडे कुकडीचा विस्तार, दुसरीकडे साकळाईला मंजुरी, निळवंडेच्या कालव्यांना गती आणि जुन्या कालव्यांच्या सुधारणांसाठी निधी या सर्व प्रकल्पांची सांगड घातली तर अहिल्यानगरच्या जलव्यवस्थेचे भवितव्य बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतीला शाश्वत पाणी मिळण्यासोबतच रब्बी आणि उन्हाळी पिकांना आधार, फळबागा आणि भाजीपाला उत्पादनाला चालना, दुग्धव्यवसाय आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना बळ मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, या सर्व घोषणा आणि निधीचे प्रत्यक्ष कामात किती वेगाने रूपांतर होते, हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या अहिल्यानगरला सिंचनसमृद्ध जिल्हा बनवण्याच्या दिशेने ही पावले निर्णायक ठरणार का? याकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.