Vikhe-Shinde Clashes : लोणीतील शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाला राम शिंदे यांच्यासह आमदारांची दांडी; विखे पाटील-राम शिंदे यांच्यातील दुरावा कायम?

0
लोणीतील शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाला राम शिंदे यांच्यासह आमदारांची दांडी; विखे पाटील-राम शिंदे यांच्यातील दुरावा कायम?
लोणीतील शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाला राम शिंदे यांच्यासह आमदारांची दांडी; विखे पाटील-राम शिंदे यांच्यातील दुरावा कायम?

Vikhe-Shinde Clashes : नगर : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यातील राजकीय दुरावा पुन्हा चर्चेत आला आहे. लोणी येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक गौरव कार्यक्रमाला राम शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

हेही वाचा : जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी सुजय विखेंचे नाव चर्चेत; विखे-थोरातांच्या युतीने गेम पलटणार?

मंत्री विखेंचा पुढाकार

शिक्षक दिनानिमित्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष पुढाकारातून लोणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ’ आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर ऐवजी लोणी येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार तसेच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची नावे होती. मात्र, या कार्यक्रमाला विधानपरिषद आमदार किशोर दराडे वगळता अनेक लोकप्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने विखे-शिंदे यांच्यातील राजकीय समीकरणांबाबत पुन्हा तर्कवितर्क सुरू झाले आहेत. प्रा. राम शिंदे हे जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यातील मतभेद अधिक तीव्र झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नक्की पहा : बॉडी घडवण्याचा नवा ‘शॉर्टकट’ ‘लूक’च्या हव्यासातून धोकादायक इंजेक्शन्स

मतदारसंघातील भेटींना प्राधान्य (Vikhe-Shinde Clashes)

आज (ता. ५) राम शिंदे यांनी लोणीतील कार्यक्रम टाळून फारसे महत्वपूर्ण नसलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना भेटी देणे पसंत केले. त्यामुळे निमंत्रण पत्रिकेत नाव असुनही शिंदे कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने विखे-शिंदे यांच्यातील दुरावा कायम असल्याचे संकेत मिळत आहेत का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने या अनुपस्थितीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. लोणीतील या कार्यक्रमाच्या निमित्ताने विखे-शिंदे एकाच व्यासपीठावर येतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.