नगर : महाराष्ट्रातील गरीब व गरजू नागरिकांना अवघ्या १० रुपयांत पोटभर आणि पौष्टिक जेवण मिळावे, यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) योजना सुरू केली आहे. मात्र अनुदानाअभावी काही शिवभोजन थाळी केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर असताना राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने ७२ कोटीचा निधी (Fund of ₹72 crore) उपलब्ध करुन दिलाय. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील 38 शिवभोजन केंद्रासाठी (38 Shivbhojan centers in the Ahilyanagar district) सुद्धा मोठा निधी उपलब्ध झालाय. तो किती आहे आहे ते जाणून घेऊ…
नक्की वाचा : डीजेला परवानगी पण आवाजाची मर्यादा; अहिल्यानगरमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय
३८ शिवभोजन केंद्रासाठी १ कोटी २५ लाख २६ हजारांचे अनुदान (Shivbhojan Thali )
गरिबांना अवघ्या १० रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र, आर्थिक संकटात सापडले आहेत. एकीकडे गरिबांची भूक भागविण्यासाठी शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली, मात्र दुसरीकडे शासनाचे अनुदान रखडल्याने शिवभोजन चालकांची फरफट सुरू होती. मात्र, राज्य सरकारने गुरूवार (दि. २३) रोजी जिल्ह्यातील ३८ शिवभोजन केंद्रासाठी १ कोटी २५ लाख २६ हजारांचे तीन महिन्यांचे अनुदान मंजूर केले आहे. यामुळे गरिबांची थाळी आता पुन्हा सजणार आहे.
अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; तपासणीस दिला नकार
शिवभोजन केंद्रांवरून दररोज तीन हजार नागरिकांना भोजन (Shivbhojan Thali )
अहिल्यानगर जिल्ह्यातील ३८ शिवभोजन केंद्रांवरून दररोज सुमारे तीन हजार नागरिकांना भोजन दिले जात आहे. मात्र, केंद्रचालकांना शासनाकडून मिळणारे अनुदान हे गेल्या मार्चपासून रखडलेले होते. यातील मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे असे तीन महिन्यांचे शिवभोजन चालकांचे अनुदान मंजूर झाले आहे. राज्य सरकारने जिल्ह्याठी १ कोटी २५ लाखांचे अनुदान मंजूर केले असले तरी अजून जून, जुलै आणि ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे अनुदान मंजूर होणे बाकी आहे. मार्चपासून म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून अनुदान रखडल्याने गरिबांची भूक भागविणार्या केंद्रचालकांवरच आर्थिक संकटाची वेळ आली होती.
राज्य शासनाने गरीब व गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी २६ जानेवारी २०२० पासून शिवभोजन थाळी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत नागरिकांना अवघ्या १० रुपयांत दोन पोळ्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण आणि एक वाटी भात दिला जातो. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिवभोजन केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध असते. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यात शासनाकडून केंद्रचालकांना मिळणारे अनुदान वेळेवर प्राप्त होत नसल्याने त्यांना या शिवभोजन केंद्राचा खर्च भागविण्यासाठी पदरमोड करावी लागत आहे.
शिवभोजन थाळी उपलब्ध करून देणार्या केंद्रचालकांना शासनाकडून प्रतिथाळी अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील केंद्रांना प्रतिथाळी २५ रुपये, तर शहरी भागातील केंद्रांना प्रति थाळी ४० रुपये अनुदान मिळते. मात्र, मार्च महिन्यापासून देयके रखडल्याने केंद्रचालकांची आर्थिक कोंडी झाली होती.जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे अनुदान थकीत असल्याची माहिती केंद्र चालकांकडून देण्यात आली होती. यातील सव्वा कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झालं आहे.
राज्यात वाढत्या महागाईमुळे प्रत्येक घरातील स्वयंपाकाचे बजेट कोलमडलेले असतांना आता शिवभोजनथाळीला सुद्धा महागाईच्या झळा बसताना दिसत आहे. पनीर सह भाजीपाला, तेल, आणि साखरेचे भाव वाढल्याने शिवभोजन चालकांना गरिबाच्या थाळीत कसेबसे अन्न शिजवून देण्याची वेळ आली आहे. वाढत्या महागाईमुळे शिवभोजन चालकांच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी होत आहे.



