ADCC Bank Elections : जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी सुजय विखेंचे नाव चर्चेत; विखे-थोरातांच्या युतीने गेम पलटणार?

0
जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी सुजय विखेंचे नाव चर्चेत; विखे-थोरातांच्या युतीने गेम पलटणार?
जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी सुजय विखेंचे नाव चर्चेत; विखे-थोरातांच्या युतीने गेम पलटणार?

ADCC Bank Elections : नगर : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला वेग आला असून, अध्यक्षपदासाठी आता राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव महत्त्वाचा मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर अध्यक्षपदासाठी खासदार सुजय विखे पाटील यांच्या नावाची चर्चाही आतापासूनच सुरू झाली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विखे-थोरात समीकरण का महत्त्वाचे?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे आणि थोरात या दोन्ही गटांचा प्रभाव मोठा आहे. थोरात यांचे संगमनेर तालुक्यात सर्वाधिक मतदार असून जिल्ह्यातील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांशी त्यांचे संबंध आहेत. दुसरीकडे विखे गटाचाही सहकार क्षेत्रात प्रभाव आहे. त्यामुळे दोन्ही गट एकत्र आल्यास निवडणुकीतील गणित मोठ्या प्रमाणात बदलू शकते. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेत विखे-थोरात हे पारंपरिक विरोधक मानले जातात. स्थानिक निवडणुकांपासून थेट लोकसभा-विधानसभा निवडणुकांत दोन्ही घराणी कायम अग्रेसर असतात. मात्र गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात विखे-थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाचा झाला होता. परंतु आता, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत परस्परविरोधी राजकारण करणारे विखे आणि थोरात एकत्र आल्यास जिल्हा बँकेच्या राजकारणाचा ‘गेम’च पलटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नक्की वाचा : कर्जमाफीच्या १०२ कोटींपैकी ४८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; आमदार कर्डिले यांची माहिती

अध्यक्षपदासाठी सुजय विखेंची चर्चा (ADCC Bank Elections)

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असतानाच, काही ठिकाणी राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे. विखे-थोरात एकत्र आल्यास जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून दोन्ही गटांमध्ये नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात होणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी सुजय विखे यांच्या नावाची चर्चा आणि विखे-थोरात संभाव्य युती ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सर्वात मोठी राजकीय घडामोड ठरण्याची शक्यता आहे. मात्र, ही संभाव्य युती प्रत्यक्षात येते का आणि अध्यक्षपदासाठी सुजय विखे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होते का, हे निवडणुकीतील पुढील घडामोडींनंतरच स्पष्ट होणार आहे.