Robbery : नगर : समृद्धी महामार्गावर वाहन दुरुस्त करणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत मोबाईल व रोख रक्कम लुटणाऱ्या (Robbery) टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल, दोन हजार रुपये रोख आणि दुचाकी असा एकूण एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धनंजय उर्फ धनु प्रकाश काळे (वय २७), स्वप्नील संतोष भारूड (वय २०), प्रशांत जालिंदर भारूड (वय २०) आणि शिवरंजन राजेश शिंदे (वय २२), सर्व रा. कोपरगाव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक ५०८ येथे ८ सप्टेंबर रोजी पहाटे सव्वाएकच्या सुमारास ही घटना घडली. अभिषेक मच्छिंद्र गायकवाड (वय २०, रा. साकुरी, ता. राहाता) हे आयशर कंपनीचे वाहन दुरुस्त करीत असताना सहा जणांच्या टोळीने त्यांना व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीला चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
चार पथकांद्वारे आरोपींचा शोध (Robbery)
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील माहिती, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. समृद्धी महामार्गावरील तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. चार दिवसांच्या सातत्यपूर्ण तपासानंतर ११ सप्टेंबर रोजी आरोपींबाबत पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली. कोकमठाण गावाच्या शिवारात, समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ दुचाकीसह काही संशयित थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तेथे कारवाई केली. यावेळी धनंजय उर्फ धनु प्रकाश काळे (वय २७), स्वप्नील संतोष भारूड (वय २०), प्रशांत जालिंदर भारूड (वय २०) आणि शिवरंजन राजेश शिंदे (वय २२), सर्व रा. कोपरगाव), यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांच्या चौकशीत धनंजय काळे याने अन्य साथीदारांच्या मदतीने हा दरोडा केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील चंदू नारायण तहकीक (रा. सावळीविहीर, ता. राहाता) आणि आणखी एक साथीदार अद्याप फरार आहे. आरोपींकडून चोरीचे दोन मोबाईल, दोन हजार रुपये रोख तसेच ८० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १७ डीपी ३२१३) असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यात घेण्यात आलेल्या धनंजय उर्फ धनु काळे आणि स्वप्नील भारूड यांच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. धनु काळे याच्यावर दरोडा, दरोड्याच्या तयारीसह चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. स्वप्नील भारूड याच्यावरही चोरी, मारहाणीसह अन्य गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलीस तपासास समोर आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे, अनंत सालगुडे, विकास जाधव व पोलीस अंमलदार रणजीत जाधव, अरूण गांगुर्डे, निळकंठ कारखेले, विष्णु भागवत, सोमनाथ झांबरे, विजय पवार, राहुल डोके, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, रिचर्ड गायकवाड, महादेव भांड, गणेश धोत्रे, सुनिल पवार, रमीजराजा आतार, अजिनाथ पाखरे, विशाल तनपुरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड व भगवान धुळे यांच्या पथकाने केली आहे.



