
ADCC Election : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला आहे. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने ऐन दिवाळीच्या काळात जिल्हा बँक निवडणुकीचे राजकीय फटाके फुटण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; ‘पिशवीतील’159 मतदार वधारले
अंतिम मतदार यादी जाहीर (ADCC Election)
जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. जून-जुलैमध्ये सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविण्यात आले होते. त्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर मोठ्या संख्येने हरकती दाखल झाल्या असून त्यावर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या अंतिम यादीत प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत 159 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील एकूण मतदारांची संख्या 3 हजार 836 वर पोहोचली आहे. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यामुळे आता निवडणुकीच्या पुढील टप्प्याला सुरुवात होणार आहे. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेरीस किंवा ऑक्टोबरमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक कार्यक्रम, उमेदवारी अर्ज, छाननी आणि मतदानाची तारीख यानंतर स्पष्ट होणार आहे.
टोलनाक्यावर ‘नो स्टॉप’!अपघातांना ‘ब्रेक’ कधी? वेळेची बचत की जीवाची किंमत?
दिवाळीत राजकीय फटाके (ADCC Election)
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील समीकरणांना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. विविध तालुक्यांतील सेवा सोसायट्या, बिगरशेती संस्था आणि शेतीपूरक मतदारसंघांवर इच्छुकांचे लक्ष आहे. आधीपासूनच संचालकपदासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू असून, अंतिम मतदार यादीत कोणाची ताकद किती राहिली, यावर पुढील राजकीय गणिते ठरणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या आधी निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो की दिवाळीच्या काळातच प्रचाराची धामधूम सुरू होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


