ADCC Bank Election : निमित्त डिंभे-माणिकडोह बोगद्याचे; बैठक मात्र जिल्हा बँकेची! नेत्यांच्या वादात शेतकरी प्रश्नाला बगल

0
निमित्त डिंभे-माणिकडोह बोगद्याचे; बैठक मात्र जिल्हा बँकेची! नेत्यांच्या वादात शेतकरी प्रश्नाला बगल
निमित्त डिंभे-माणिकडोह बोगद्याचे; बैठक मात्र जिल्हा बँकेची! नेत्यांच्या वादात शेतकरी प्रश्नाला बगल

ADCC Bank Election : नगर : डिंभे-माणिकडोह जोडबोगदा आणि घोड-साकळाई पाणीप्रश्नावर सर्वपक्षीय चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीतच राजकीय गटबाजी उफाळून आल्याने श्रीगोंद्यातील नेत्यांमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत युवा नेते प्रशांत दरेकर आणि ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. एकीकडे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नावर ठोस भूमिका अपेक्षित असताना, दुसरीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातील पडद्यामागील राजकीय हालचालींची चर्चा रंगल्याने बैठकीच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या स्थगितीनंतर राष्ट्रवादीत खळबळ? घनःशाम शेलारांच्या घोषणेने नवा राजकीय ट्विस्ट; जगताप-नागवडे-पानसरेंच्या भूमिकेकडे लक्ष

बोगद्याच्या चर्चेआधी जिल्हा बँकेची खलबते?

काल (ता. २०) सभापती प्रा. राम शिंदे पुण्याहून कर्जत-जामखेडकडे जात असताना श्रीगोंद्यात सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली. डिंभे-माणिकडोह जोडबोगदा आणि घोड-साकळाई पाणीप्रश्नावर चर्चा करून पुढील दिशा ठरविणे, हा या भेटीमागील प्रमुख उद्देश होता. मात्र, मुख्य बैठकीपूर्वीच शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बंद दाराआडच्या बैठकीमुळे राजकीय चर्चांना वेगळेच वळण मिळाले. प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस आणि घनश्याम शेलार यांच्यासोबत स्वतंत्र बैठक झाल्याची चर्चा आहे. या बैठकीत आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे समजते. विशेष म्हणजे, राजेंद्र नागवडे यांचे चिरंजीव युवा नेते दिग्विजय नागवडे यांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये होती. बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय हालचाली आणि नेत्यांच्या स्वतंत्र बैठकांमुळे डिंभे-माणिकडोह बोगदा व पाणीप्रश्नापेक्षा जिल्हा बँकेच्या राजकारणालाच अधिक महत्त्व दिले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

पंजाबराव डख यांचं कुठं चुकले? त्यांच्या हवामान अंदाजावरचा विश्वास का उडतोय?

नागवडे गटाच्या नाराजीतून वादाची ठिणगी (ADCC Bank Election)

बंद दाराआडची बैठक संपल्यानंतर सुमारे १५ ते २० प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक सुरू झाली. यावेळी दिग्विजय नागवडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे युवा नेते प्रशांत दरेकर यांनी आपले मत मांडण्यासाठी हात वर केला. मात्र, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी त्यांना अडवत ‘तू बोलू नको’ असे म्हटल्याने वादाची ठिणगी पडली. आधीच आपल्या नेत्याला बैठकीतून डावलल्याच्या चर्चेमुळे नाराज असलेल्या दरेकर यांनी भोस यांना प्रत्युत्तर दिले. ‘आम्हाला का डावलता? आम्हालाही बोलण्याचा अधिकार आहे,’ अशी भूमिका घेत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. डिंभे-माणिकडोह बोगदा आणि घोड-साकळाई पाणीप्रश्नावर चर्चा होणे अपेक्षित असताना बैठकीत नेत्यांमधील वादानेच लक्ष वेधून घेतले. राजेंद्र म्हस्के, हरिदास शिर्के यांच्यासह इतर नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवळला.

केडगावमध्ये वेश्या व्यवसायावर छापा; कोतवाली पोलिसांनी बांग्लादेशीसह तीन जणांना घेतले ताब्यात

एकजुटीच्या घोषणांआड गटबाजी? (ADCC Bank Election)

शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर सर्वपक्षीय एकजूट दाखविण्याच्या प्रयत्नांना बैठकीतील या प्रकारामुळे धक्का बसल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील राजकीय समीकरणे जुळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असतानाच, बैठकीतील वादाने अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर आणली आहे. डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या निमित्ताने एकत्र आलेले नेते प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर किती एकवटले आणि जिल्हा बँकेच्या राजकारणात कोणती समीकरणे जुळवत आहेत, याची चर्चा आता श्रीगोंद्यात रंगू लागली आहे.