No-confidence motion passed against Nahata : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रवीणकुमार ऊर्फ बाळासाहेब नाहटा यांना मोठा धक्का बसला आहे. नाहटा यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव १७ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. दत्तात्रेय पानसरे यांच्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील आणखी एका नेत्याला राज्यस्तरीय पदावरून पायउतार व्हावे लागल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या सभापतिपदावरून नाहटा यांना हटविण्यासाठी संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर निर्णय घेण्यासाठी काल (ता. २१) संघाच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत ठरावाच्या बाजूने सर्व उपस्थित संचालकांनी मतदान केल्याने नाहटा यांना सभापतिपद गमवावे लागले.
भारतात पाडलं पण आपण स्वीडनमध्ये खासदार झालो; सुजय विखेंचे वक्तव्य चर्चेत
१७ संचालकांचे ठरावाच्या बाजूने मतदान
संघाच्या २१ संचालकांपैकी १७ संचालक बैठकीला उपस्थित होते. नाहटा यांच्यासह संदीप काळे, बाबा पाटील आणि मनीष दळवी हे चार संचालक अनुपस्थित होते. संचालक अंकुश आहेर यांनी अविश्वास ठराव मांडला, तर पोपटराव सोनवणे यांनी त्यास अनुमोदन दिले. उपस्थित सर्व १७ संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे १७ विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. दरम्यान एका प्रकरणात आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात नाहटा अटकेत आहेत. या पार्श्वभूमीवर संचालकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला आहे.
पानसरेंनंतर नाहटांनाही धक्का (No-confidence motion passed against Nahata)
श्रीगोंदा तालुक्यातील दत्तात्रेय पानसरे आणि बाळासाहेब नाहटा ही जोडी राजकीयदृष्ट्या प्रभावशाली मानली जाते. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात कार्यरत आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी श्रीगोंदा तालुक्याला राज्यस्तरावर नेतृत्व करण्याची संधी देत या दोन्ही नेत्यांना महत्त्वाची पदे दिली होती. मात्र, विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी पानसरे यांनी घेतलेली भूमिका त्यांना नडल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर होऊन त्यांना राज्य पणन महासंघाचे पद गमवावे लागले होते. आता त्यांच्यापाठोपाठ नाहटा यांच्याविरोधातही अविश्वास ठराव मंजूर झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
निमित्त डिंभे-माणिकडोह बोगद्याचे; बैठक मात्र जिल्हा बँकेची! नेत्यांच्या वादात शेतकरी प्रश्नाला बगल
श्रीगोंद्यात चर्चांना उधाण (No-confidence motion passed against Nahata)
विधानपरिषद निवडणुकीत पानसरे यांना साथ दिल्यामुळे नाहटा यांच्याविरोधातही अविश्वास ठराव आणला गेला का, अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र, या राजकीय चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे नाहटा यांच्याविरोधातील कारवाईमागे नेमकी कोणती राजकीय समीकरणे आहेत, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. श्रीगोंदा तालुक्याला राज्यस्तरावर मिळालेल्या नेतृत्वाच्या संधींपैकी दोन महत्त्वाची पदे अल्पावधीत गेल्याने स्थानिक राजकारणात या घडामोडींचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. बाजार समिती संघाच्या नव्या नेतृत्वाची निवड आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढील राजकीय हालचालींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



