नगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. या प्रकरणावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar on MPSC) चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. MPSC आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी रोहित पवाराकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या २६ तारखेला पुण्यात विद्यार्थ्याचं आंदोलन होणार आहे. मात्र गणेशोत्सवाचे कारण देत २६ तारखेला होणाऱ्या आंदोलनाला(Pune Protest) पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यानंतर रोहित पवारांनी आपली भूमिका सांगितली आहे.
नक्की वाचा : राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, १२ जागांसाठी निवडणूक, भाजपचे आठ खासदार होणार निवृत्त
‘शास्त्री रोड परिसरात आंदोलनाला परवानगी नाही’ (Rohit Pawar on MPSC)

आंदोलनाचे स्थळ हे गर्दीचे असल्यामुळे आम्ही परवानगी देऊ शकत नाही,असं स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी रोहित पवारांना दिले आहे. पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली होती. मात्र, शास्त्री रोड परिसरात कलम १६३ लागू असल्यामुळे परवानगी देता येणार नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
अवश्य वाचा : श्रीरामपूरच्या ‘रणरागिणी’ आईचे धाडस, लेकासाठी बिबट्याशी थेट भिडली!
रोहित पवार काय म्हणाले? (Rohit Pawar on MPSC)
२६ तारखेला विद्यार्थी आंदोलन करणार होते. एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. तुकाराम मुंढे आणि सुनील गेडाम यांना आयोगाचे अध्यक्ष करा, ऑफलाईन परीक्षा घेण्याची मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली आहे. गणेशोत्सव काळात आंदोलन करायला नको, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. २६ तारखेला आंदोलन करता येणार नाही, असं पुणे पोलिसांनी आज सांगितल्याचे पवार म्हणाले. पोलिसांनी आंदोलनाला अजून परवानगी दिली नाही. ‘आम्ही २७ तारखेला सकाळी दहा वाजता गरवारे रोडवर आंदोलन करणार म्हणजे करणार’ अशी भूमिका रोहित पवारांनी घेतली आहे. मात्र त्यापूर्वी सरकारला जर वाटलं, आमच्या १५ विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करावी तर ते करु शकतात. विद्यार्थ्यांमध्ये कुठलाही गट पडलेला नाही असेही पवार म्हणाले.



