नगर : नेवासा (Nevasa News) तालुक्यातील सौंदाळा गाव (Saundala Village) हे महाराष्ट्रात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेलं आहे. ‘जातमुक्ती’ चा ऐतिहासिक निर्णय घेत संपूर्ण देशासमोर एक नवा आदर्श ठेवलाय. आता या गावाने पुन्हा विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या पाहता काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव व लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांत १३ ते १८ वयोगटातील ९ शालेय विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicides among school students) केल्या. अशा घटनांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सौंदाळा येथील ग्रामसभेत विशेष उपाययोजना करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती सरपंच शरद आरगडे यांनी दिलीय.
नक्की वाचा : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कर्जमाफीचा तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

सौंदाळा येथील ग्रामसभेत करण्यात आलेले ठराव? (Newasa News)
१. गावातील १० जणांना उत्कृष्ट समुपदेशनाचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधण्यासाठी तयार केले जाईल.
२. आपल्या मुलांची इतरांशी तुलना न करणे, गुणांचा सतत दबाव न आणणे आणि संवाद वाढवण्याबाबत पालकांचे प्रबोधन केले जाईल. तसेच विद्यार्थ्यांचा मोबाइल वापर कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.
३.प्रत्येक शाळेत विश्वासू शिक्षक किंवा वर्ग प्रतिनिधीची नियुक्ती केली जाईल आणि विद्यार्थ्यांसाठी गोपनीय हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल.
४ विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी गावात वाचन कट्टे तयार करून पुस्तके उपलब्ध केली जातील. तसेच मानसिक तणाव, नैराश्य, परीक्षा-ताण, कौटुंबिक समस्या व करिअरच्या चिंतेवर नियमित संवाद सत्रे घेतली जातील. असे सगळे निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आलेत.
अवश्य वाचा : ‘आंदोलनाच्या नावाखाली मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली’; नवनाथ वाघमारे यांचा गौप्यस्फोट
सरपंच शरद आरगडे काय म्हणाले? (Newasa News)
सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे म्हणालेत की, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई-वडील अहोरात्र कष्ट करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलतात. अशा परिस्थितीत शालेय वयातच मुलांनी जीवनयात्रा संपविणे, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. या पार्श्वभूमीवर केवळ हळहळ व्यक्त करण्यापेक्षा ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे उपक्रम केवळ एकदाच होणाऱ्या समुपदेशनापुरता मर्यादित राहणार नाहीत, यामागे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा नियमित आढावा घेणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे आणि गरजू विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडे उपचारासाठी पाठवण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे. विद्यार्थ्यांनी मनातील समस्या न लपवता पालक, शिक्षक किंवा समुपदेशकांशी मोकळेपणाने संवाद साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
या ग्रामसभेला सौंदाळा शाळेचे मुख्याध्यापक पोपट घुले, अनिल टेकणे, ग्राम महसूल अधिकारी शशिकला शिरसाठ, गणेश आरगडे, सचिन आरगडे, लक्ष्मण चामुटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



