Brutal Murder : पारनेर : सुपा औद्योगिक वसाहतीतील कंपनीत रात्रपाळी करून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून (Brutal Murder) झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ९) सकाळी उघडकीस आली. मयूर थोरात (वय २७, रा. पिंपरी गवळी, ता. पारनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. रुई छत्रपती–पिंपरी गवळी रस्त्यावरील पुलाजवळ त्याचा मृतदेह (Dead Body) रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धारदार हत्याराने वार करून तसेच लाकडी दांडक्याने मारहाण (Assault) करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
नक्की वाचा : परराज्यातील मद्याला महाराष्ट्राचे बनावट लेबल; एक लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त
डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा
मयूरच्या पाठीवर, पोटावर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा अपघात नसून घातपात करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रात्रपाळी संपवून घरी परतत असताना निर्मनुष्य रस्त्यावर त्याच्यावर हल्ला करण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयूरचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. संसाराची नव्याने सुरुवात केलेल्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे पिंपरी गवळी परिसरात शोककळा पसरली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पोलिसांसमोर आव्हान (Brutal Murder)
मयूरच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सुपा पोलीस ठाण्यात ठिय्या देत अज्ञात आरोपीविरोधात तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना तातडीने अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, या घटनेमागे वैयक्तिक वैमनस्य, पूर्ववैमनस्य किंवा अन्य कोणते कारण आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मयूरच्या हत्येचे गूढ उकलून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणातील तपासातून हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



