Social Media : नगर : सोशल मीडियावरील (Social Media) चुकीच्या गोष्टी थांबविण्यासाठी हस्तक्षेप करून समाजाला चांगल्या गोष्टी देणे आणि समाजपरिवर्तनासाठी माध्यम म्हणून काम करणे आवश्यक आहे. रिल्स (Reels) व शॉर्ट व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचा प्रभावी वापर करून चांगल्या व्हिडिओंसारख्या माध्यमांतून समाजात सकारात्मक बदल घडवता येऊ शकतात, असे मत दिल्लीतील ज्येष्ठ संपादक अभिजीत कांबळे (Abhijit Kamble) यांनी व्यक्त केले.
नक्की वाचा : चार लाख लिटर पाणी मंजूर मात्र, प्रत्यक्ष पुरवठा अडीच लाख लिटरच; पारनेरमध्ये तीव्र पाणीटंचाई
‘दिंडी : वे ऑफ लाइफ’ या निरीक्षणात्मक लघुपटाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाल्याबद्दल सकल भारतीय समाजाच्या वतीने लघुपटाचे दिग्दर्शक भैरवनाथ वाकळे व उज्वला वाकळे यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी कांबळे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभ्यासक प्रा. संदीप गिऱ्हे उपस्थित होते.
तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण
कांबळे म्हणाले, पुरोगामी असलेल्या वारकरी संप्रदायाला हायजॅक करण्याचे काम प्रतिगामी शक्ती करत आहेत. वारकरी संप्रदायात घुसून ताबा घेण्याचे काम सुरू आहे. त्याविरोधात प्रतिक्रांती करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. आपले म्हणणे मांडण्यासाठी नवीन पद्धत निवडताना व्हिडिओ हे सर्वोत्तम माध्यम ठरत आहे. सामाजिक व परिवर्तनवादी विषय लिहिण्यापेक्षा व्हिडिओचा परिणाम अधिक होतो. शहर असो ग्रामीण भाग सर्वत्र उपलब्धता असल्याने तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण झाले आहे, असेही कांबळे म्हणाले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
चित्रपटसृष्टीच्या ऐतिहासिक प्रवासाचा आढावा (Social Media)
प्रा. संदीप गिऱ्हे यांनी चित्रपटसृष्टीच्या ऐतिहासिक प्रवासाचा आढावा घेतला. 1900 पूर्वीच्या फिल्मी दुनियेपासून त्यांनी आपल्या विवेचनाला सुरुवात केली. नाटकाची सुरुवात, नाटकाचे चित्रीकरण करून ते थिएटरमध्ये दाखविणे, विविध ठिकाणी चित्रीकरण करणे, कथा लेखन आणि कथेनंतर स्क्रिप्टचा विकास, अशा टप्प्यांतून फिल्म ते सिनेमा हा प्रवास कसा घडत गेला, हे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना भैरवनाथ वाकळे म्हणाले, सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी कसा वापर करावा, यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांनी हे तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे. सध्या मोबाईल सर्वांच्या हातात असून, सोशल मीडियाची साधने सर्वाधिक प्रभावी बनली आहेत. यावेळी त्यांनी लघुपटाच्या चित्रीकरणादरम्यान आलेले अनुभव सांगितले.
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
सूत्रसंचालन प्रा. महेबूब सय्यद यांनी केले. वाकळे यांच्या मानपत्राचे वाचन सॅम्युअल वाघमारे यांनी केले. यावेळी ॲड. श्याम असावा, सुभाष वारे, युनुस तांबटकर, शाकीर शेख, संध्या मेढे, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, ॲड. संतोष गायकवाड, प्रा. मेहबूब सय्यद, अभिजीत वाघ, आसिफ खान दुलेखान, वैदेही बल्लाळ, सायली तोरणे, नेहाल घोडके, प्रकाश झावरे, सुधीर लंके, वैशाली तोडमल, वर्षा थोरवे, उज्ज्वला वाकळे, समृद्धी वाकळे, ललिता केदारे, रामदास वागस्कर, अर्जुन बोरुडे, संतोष गायकवाड, मोहसीन शेख, विजय केदारे, अतुल देठे, संजय वाघ, किरण डहाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



