Tofkhana Police : नगर : तपोवन रोड (Tapovan Road) परिसरात पानटपरी चालकासह त्याच्या आईला लोखंडी कोयता, रॉड आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून रोख रक्कम लुटल्याच्या प्रकरणात तोफखाना पोलिसांनी (Tofkhana Police) ताहीर मुन्ना शेख याच्यासह त्याच्या आठ साथीदारांविरुद्ध कारवाईचा फास आवळला आहे. या टोळीवर संघटित गुन्हेगारी (Organized Crime) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ढवण वस्ती, तपोवन रोड येथील शिवाय पान शॉपजवळ हा प्रकार घडला. फिर्यादीने संबंधितांना तेथे भांडण करू नका, असे सांगून जाण्यास सांगितले होते. त्यानंतर आरोपी पुन्हा त्या ठिकाणी आले. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी, त्याची आई आणि साक्षीदारांना लोखंडी कोयता, रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर पानटपरीत घुसून गल्ल्यातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : सोशल मीडियाचा वापर समाजपरिवर्तनासाठी करा; अभिजीत कांबळे यांचे आवाहन
गंभीर गुन्हे दाखल
यश भगवान बुटटे (वय २२, रा. पडका महाला जवळ कजबे वस्ती तपोवन रोड सावेडी अहिल्यानगर), प्रतिक नवनाथ तागड रा. तागड वस्ती, वाणी नगर पाईप लाईन रोड अहिल्यानगर), ताहिर मुन्ना शेख रा तपोवन रोड अहिल्यानगर), आदेश थोरात रा. ढवण वस्ती ता जि अहिल्यानगर), आदित्य लक्ष्मीकांत जाचक वय २०, रा. काकासाहेब म्हस्के कॉलेजच्या समोर बोल्हेगाव अहिल्यानगर), तुषार लहानु पानसरे रा. एमआयडीसी अहिल्यानगर), विकास अशोक नन्नवरे वय २४, रा. वाणीनगर पाईप लाईन नगर सावेडी अहिल्यानगर), यशराज आव्हाड रा. श्रीराम चौक पाईप लाईन रोड अहिल्यानगर), साहिल कनगरे रा. तपोवन रोड सावेडी अहिल्यानगर), व त्यांचे साथीदार यांच्या विरुध्द तोफखाना पोलीस, ठाणे, एम.आय.डी.सी, पोलीस स्टेशन हद्दीत विरुध्द अशा अनेक प्रकारचे गंभीर स्वरुपाचे ५ गुन्हे दाखल आहेत.
ज्यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, गैर कायद्याची मंडळी जमून दंगा करणे, मारामारी करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक हत्याराने मारहाण करणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
संबंधितांच्या वर्तनात सुधारणा नाही (Tofkhana Police)
या प्रकरणातील ताहेर मुन्ना शेख आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध तोफखाना, एमआयडीसी यांसह विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यापूर्वी गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल असून मारहाण, दंगल, घातक शस्त्रांनी हल्ला, धमकी आणि इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही संबंधितांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने कठोर कारवाई करण्याची गरज पोलिसांनी व्यक्त केली. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम १११ वाढीव स्वरूपात लागू करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित टोळीविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.
गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई होणार
ही करवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, मसपोनि कल्पना चव्हाण, पोलीस हवालदार काळे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत झिने आणि पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.तसेच शहरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तोफखाना पोलिसांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना न घाबरता कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



