Mohatadevi Gad : नवरात्रोत्सवात देवीभक्तांच्या स्वागतासाठी गड सज्ज; उद्या मोहटादेवी गडावर घटस्थापना

धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता घटस्थापना; नवरात्रोत्सवासाठी गडावर जय्यत तयारी

0
Mohatadevi Gad : नवरात्रोत्सवात देवीभक्तांच्या स्वागतासाठी गड सज्ज; उद्या मोहटादेवी गडावर घटस्थापना
Mohatadevi Gad : नवरात्रोत्सवात देवीभक्तांच्या स्वागतासाठी गड सज्ज; उद्या मोहटादेवी गडावर घटस्थापना

Mohatadevi Gad : पाथर्डी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या (Navratri Festival) पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर (Mohatadevi Gad) उत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, देवीभक्तांच्या स्वागतासाठी संपूर्ण गड सज्ज झाला आहे. रविवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष तथा धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना (Ghatasthapana) होणार असून, त्यानंतर नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होईल. राज्याच्या विविध भागांतून घटी बसण्यासाठी महिला भाविक गडावर दाखल होऊ लागल्या आहेत. नऊ दिवसांच्या या उत्सवासाठी देवस्थान समितीने धार्मिक विधींसह भाविकांच्या सोयी-सुविधांचे काटेकोर नियोजन केले आहे.

पाथर्डी शहरापासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर स्वयंभू श्री मोहटादेवीचे स्थान आहे. देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक गडावर येतात. देवस्थान समितीने लोकवर्गणीतून कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य मंदिराची उभारणी केली आहे. श्री यंत्राकार रचनेचे हे मंदिर आकर्षक वास्तुशैलीमुळे भाविकांचे लक्ष वेधून घेते. नवरात्रोत्सवाच्या काळात गडावर धार्मिक वातावरण निर्माण होत असून, देवीच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून भाविकांची गर्दी होते.

नक्की वाचा : ताहीर मुन्ना शेख टोळीवर संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम; तोफखाना पोलिसांची कारवाई

Mohatadevi Gad : नवरात्रोत्सवात देवीभक्तांच्या स्वागतासाठी गड सज्ज; उद्या मोहटादेवी गडावर घटस्थापना
Mohatadevi Gad : नवरात्रोत्सवात देवीभक्तांच्या स्वागतासाठी गड सज्ज; उद्या मोहटादेवी गडावर घटस्थापना

सुसज्ज भक्तनिवास व अतिथी निवासाची सुविधा

नवरात्रोत्सवात भजन,कीर्तन,महाआरती, नामस्मरण,कुमारिका पूजन, सुवासिनींची ओटी भरणे, दृष्ट काढणे, कुंकुमार्चन यांसह विविध धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहेत. घटस्थापनेनंतर नऊ दिवस गडावर भक्तिमय वातावरण राहणार असून, देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नियोजनबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थान प्रशासनाने आवश्यक व्यवस्था केली आहे.गडावर येणाऱ्या भाविकांसाठी सुसज्ज भक्तनिवास व अतिथी निवासाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. देवी भक्तांसाठी मोफत महाप्रसाद, शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनमार्गावर अष्टभैरव, चौसष्ट योगिनी आणि दशमहाविद्या मंदिरांचे दर्शन घेता येणार आहे. मंदिरातील आकर्षक गाभारा आणि दर्शनव्यवस्थेमुळे भाविकांना देवीचे दर्शन सुलभ होणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Mohatadevi Gad : नवरात्रोत्सवात देवीभक्तांच्या स्वागतासाठी गड सज्ज; उद्या मोहटादेवी गडावर घटस्थापना
Mohatadevi Gad : नवरात्रोत्सवात देवीभक्तांच्या स्वागतासाठी गड सज्ज; उद्या मोहटादेवी गडावर घटस्थापना

सीसीटीव्ही कॅमेरे व बॅरिकेडिंगची व्यवस्था (Mohatadevi Gad)

नवरात्रोत्सवासाठी गड व परिसरात काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण केलेले रुंद रस्ते, दिशादर्शक फलक, संरक्षण कठडे, स्वागत कमानी आणि सूचना फलक उभारण्यात आले आहेत. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे व बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी चप्पल स्टँड, ऊन-पावसापासून संरक्षणासाठी शेड व मंडप आणि पथदिव्यांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासह भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थान समितीने विशेष खबरदारी घेतली आहे. त्याचप्रमाणे नारळ,पेढा,साडी चोळी फुलहार याची दुकानी थाटले आहेत.

यांचा सहभाग

देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळ व देवस्थान प्रशासन उत्सवाचे नियोजन करीत आहे. या नियोजनात विश्वस्त तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त विशाल शेंडे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र धस, विश्वस्त बाबासाहेब दहिफळे, शुभम दहिफळे, शशिकांत दहिफळे, अशोक दहिफळे, राजेंद्र शिंदे, अॅड. विक्रम वाडेकर, अॅड. कल्याण बडे, अॅड. प्रसन्न दराडे, श्रीकांत लाहोटी, अॅड. ऋतिका कराळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांचा सहभाग आहे.

मंदिरावर आकर्षक रोषणाई

मोहटादेवी गडासह पाथर्डी तालुक्यातील विविध देवी मंदिरांतही नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. धामणगाव देवी, दगडवाडी, तोंडोळी, वडगाव, तिसगाव, खांडगाव, रेणुकाईवाडी आणि कोल्हार येथील देवी मंदिरांत रविवारी घटस्थापना होणार आहे. पाथर्डी शहरातील गाडगे आमराई, तिवळण येथील तेली समाजाचे तुळजाभवानी मंदिर, चौडेश्वरी गल्ली, अष्टवाडा येथील चौंडेश्वरी मंदिर, चिंचपूर रोडवरील रेणुकामाता मंदिर, चांदगाव रोडवरील चौडाळेश्वरी मंदिर आणि साखरे वस्ती येथील तुळजाभवानी मंदिर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आली आहेत. या मंदिरांतही घटस्थापनेनंतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शारदीय नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी मोहटादेवी गडासह तालुक्यातील देवी मंदिरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील नऊ दिवस भक्तिरसात न्हाऊन निघण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.

मोहटादेवी गडावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये ३४ पोलीस अधिकारी, पुरुष व महिला मिळून २४१ पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाची १ तुकडी (१ अधिकारी व २५ ते ३० कर्मचारी ),देवीच्या गाभारा बंदोबस्तासाठी ८ कर्मचारी, एक फिरते पोलीस पथक आणि १०० होमगार्डचा समावेश आहे. याशिवाय मोहटादेवी देवस्थान ट्रस्टचे सुरक्षारक्षकही भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवासाठी गडावर येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता, गर्दीचे नियोजन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

भाविकांच्या सेवेसाठी १०० एसटी बसेसचे नियोजन

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पाथर्डी एसटी आगाराच्या वतीने विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध आगारांमधून १०० एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले असून, भाविकांची गर्दी लक्षात घेऊन बसफेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. त्यासाठी मोहटादेवी गडाच्या पायथ्याशी तात्पुरत्या स्वरूपात एसटी बसस्थानक उभारण्यात आले आहे. या व्यवस्थेमुळे नवरात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असून, गर्दीच्या नियोजनालाही मदत होणार आहे.