Madhu Kambikar Passes Away: लावणीचा सूर हरपला! ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचा संघर्षमय प्रवास कसा होता?

0
Madhu Kambikar Passes Away: लावणीचा सूर हरपला! ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचा संघर्षमय प्रवास कसा होता?

नगर : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी व आपल्या लावणीच्या अदांनी रसिक मनाला भुरळ पाडणारी अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर (Madhu Kambikar Passes Away) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी पुण्यात (Pune) अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मधु कांबीकर या आजाराशी झुंज देत होत्या. त्या केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर लोककलेचा वारसा जपणाऱ्या समर्थ लावणी कलावंतही होत्या. मधू कांबीकर यांच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याशी सुद्धा जवळच नातं होते. त्यांच मूळ गावं हे शेवगाव तालुक्यातील कांबी आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील कांबी गावापासून सुरू झालेल्या प्रवासात त्यांना अनेक संकटे आली तरी त्यांनी धीर न सोडता आत्मविश्वासाने परिस्थितीवर मात केली. त्यांचा हा प्रवास नेमका (Life’s Journey) कसा होता हे पाहू…

नक्की वाचा : रहस्य आणि स्त्रीशक्तीचा संगम; ‘दशमी’च्या गाण्यात दिसणार गौरी इंगवलेचा रौद्र अवतार

मधू कांबीकर यांचा जीवनप्रवास (Madhu Kambikar Passes Away)

मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द इथं झाला. कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर १९७३ मध्ये मुंबईतील लालबाग इथल्या न्यू हनुमान थिएटरमधून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. चित्रपट, लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी ते दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून मधू कांबीकर यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ आणि ‘येऊ का घरात’ यांसारख्या सिनेमामधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या. तसंच ‘आज झाले मुक्त मी’ या चित्रपटातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. 

अवश्य वाचा : ‘सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत आहे’ ;अभिजीत दीपकेंना अटक करताच मनोज जरांगे संतापले

दादू इंदूरीकरांच्या गाढवाचं लग्न नाटकात मधु कांबीकर यांनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली. पुढे ‘भानगडीशिवाय पुढारी नाही’, विच्छा माझी पुरी करा या गाजलेल्या नाटकांमधून मधु कांबीकर यांनी रंगभूमी गाजवली. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आई, सासू अशा विविध भूमिका साकारल्या. विदेश गोष्ट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका त्यांनी अनेकवेळा साकारली होती. मधू यांनी हिंदी सिनेमांमध्येही कामं केल. नाना पाटेकर, ऋषी कपूर अभिनीत ‘हम दोनो’ या चित्रपटात मधु कांबीकर यांनी नाना पाटेकरांच्या आईची भूमिका साकारली होती.

मधू कांबीकर यांच्यामुळे लावणी विदेशात पोहोचली (Madhu Kambikar Passes Away)

१९७७ मध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी दिल्लीमध्ये नृत्यनाट्य सादर केलं. त्यांच्या लावणीतील सहजता, अभिनय आणि हावभाव यामुळे त्यांना महाराष्ट्रभर ओळख मिळाली.तसेच ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमातून त्यांनी लावणीची अस्सल परंपरा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अमेरिका, दुबई, अबू धाबी आणि मॉरिशस यांसारख्या देशांत पोहोचवली.

मात्र २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मधु कांबीकर यांच्या आयुष्यात एक अत्यंत वेदनादायी घटना घडली. २७ नोव्हेंबरला त्यांनी मुंबईतील मांटुगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमात नृत्य सादर केले होते. तब्बल १२ वर्षांनंतर त्या स्टेजवर नृत्य सादर करणार होत्या. पण कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना त्यांची अचानक प्रकृती खालावली. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. पण त्यांनी नृत्य सादर करणं थांबवलं नाही. त्यांनी जिद्दीने सादरीकरण पूर्ण केलं. त्यानंतर त्या मेकअप रुमध्ये गेल्या. मेकअप रुममध्येच त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार सुरू करण्यात आले. 

पक्षाघाताच्या झटक्यानंतर मधू कांबीकर यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी आढळल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. या आरोग्यविषयक अडचणींमुळे त्यांना पूर्वीप्रमाणे चित्रपट, नृत्य आणि रंगमंचावर सक्रिय राहणे शक्य झाले नाही. २०१८ साली त्यांना झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. पण प्रकृती अस्वस्थ असल्याकारणाने त्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी सोहळ्यात उपस्थित राहू शकल्या नाहीत. लावणीचे जतन व्हावे, म्हणून त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना मोलाचे प्रशिक्षणही दिले. मात्र मधू कांबीकर यांच्या निधनाने आता ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक ओळख मिळवून देणारी एक बुलंद व मोहक कलाकारा हरपली आहे.