Rasta Roko : पाथर्डी : चारा द्या… पाणी द्या… हाताला काम द्या…अशा घोषणा देत भगवानगड (Bhagwangad) परिसरातील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १५) सकाळी कल्याण–निर्मल (विशाखापट्टणम) राष्ट्रीय महामार्गावरील तुळजवाडी फाटा येथे बैलगाड्या व जनावरांसह रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन केले. दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या शेतकरी आणि पशुधनाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) वतीने हे आंदोलन करण्यात आले.
नक्की वाचा : पाथर्डीत चाकूचा धाक दाखवून दोन लाखांची बॅग लुटली; स्थानिक गुन्हे शाखेकडून चारजण ताब्यात

केवळ पंचनामे केले जात असल्याचा आरोप
जनावरांसाठी चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, पिकांचे नुकसान आणि चारा-पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांसमोर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याबरोबरच जनावरांना जगविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून ठोस उपाययोजना होण्याऐवजी केवळ पंचनामे केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जनावरांसाठी चारा कुठून आणायचा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विकास वाघ म्हणाले, पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती भीषण आहे. या भागातील शेतकरी चारा आणि पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड देत आहेत. अशा वेळी शासन आणि प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येणे अपेक्षित आहे. मात्र, सरकार केवळ पंचनामे करण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. जनावरांना चारा आणि पाणी कुठून उपलब्ध करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शासनाने तातडीने चारा, पाणी आणि रोजगाराची व्यवस्था करावी. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणि तातडीची मदत मिळणे आवश्यक (Rasta Roko)
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे म्हणाले, शासनाने दिवाळीपूर्वी जाहीर केलेली मदत अपुरी असून, ती शेतकऱ्यांची चेष्टा करणारी आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत मदत मिळाली पाहिजे. जनावरांसाठी चारा छावण्या, पिण्याचे पाणी आणि हाताला काम या सुविधा तातडीने सुरू करण्याची गरज आहे. मात्र, पाच हजार रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करावी, अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशी टीका त्यांनी केली.
शेतकरी अडचणीत असताना केवळ पंचनामे करून प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणि तातडीची मदत मिळणे आवश्यक आहे. चारा, पाणी आणि रोजगाराच्या उपाययोजना कोणताही विलंब न करता सुरू कराव्यात, अशी मागणी बाळासाहेब गर्जे यांनी केली. आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाथर्डी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दिग्विजय पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलकांच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्या. चारा आणि पाण्याच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विकास वाघ, बाळासाहेब गर्जे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, दत्तात्रय फुंदे, बाबासाहेब वाघ, सोमनाथ कराड, पाराजी शिरसाट, प्रा. सुनील पाखरे, सचिन गर्जे, अजित गर्जे, लक्ष्मण गीते, अशोक गर्जे, बाबू घुले, सचिन ढाकणे, बाळासाहेब पाखरे, शिवाजी नरसाळे, संदीप कराड यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन कंडारे तसेच गुप्तवार्ता विभागाचे नागेश वाघ, नितीन दराडे, भाऊसाहेब खेडकर, संदीप नागरगोजे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.



