Shirdi Saibaba : साईचरणी गुप्त दात्याकडून २७ लाखांची अनमोल भेट; संगमरवरी शिळांवर सोन्याच्या कोटिंगमध्ये कोरली साईबाबांची ११ वचने

0
Shirdi Saibaba : साईचरणी गुप्त दात्याकडून २७ लाखांची अनमोल भेट; संगमरवरी शिळांवर सोन्याच्या कोटिंगमध्ये कोरली साईबाबांची ११ वचने

नगर : श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या शिर्डीतील साईबाबांच्या (Shirdi Saibaba) चरणी एका अज्ञात भक्तानं अनोखी भेट (A Unique Gift) अर्पण केली आहे. राजस्थानातून विशेष मागवलेल्या तीन भव्य संगमरवरी शिळांवर साईबाबांची पवित्र ११ वचने (Sai Baba’s 11 Sacred Sayings) आकर्षक कलाकुसरीत कोरण्यात आली आहेत. त्यांना सोन्याच्या कोटिंगची झळाळी देण्यात आली आहे.

नक्की वाचा : दुष्काळमुक्तीचा अण्णा हजारेंचा ‘राळेगण पॅटर्न’! विशेष निवारण आराखडा तयार

संगमरवरी शिळांवर रेखाटली साईबाबांची ११ वचने (Shirdi Saibaba)

राजस्थानातून मागवलेल्या पांढऱ्या शुभ्र संगमरवरी शिळांवर साईबाबांची ११ वचने अत्यंत देखण्या अक्षरांत कोरण्यात आली आहेत. आकर्षक डिझाइन, सुंदर रंगसंगती आणि सोन्याच्या कोटिंगमुळे या वचनांचे सौंदर्य अधिक खुलले आहे. प्रत्येक शिळेचे वजन सुमारे अडीच टन आहे. तिन्ही शिळांचे एकूण वजन साडेसात टन आहे. या शिळांची एकूण किंमत सुमारे २७ लाख रुपये असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे. केवळ मौल्यवान वस्तूंचे दान न करता साईबाबांची शिकवण भाविकांपर्यंत पोहोचावी, या भावनेतून ही भेट देण्यात आली आहे.

अवश्य वाचा : हरवलेले पैसे मिळताच आजीचे डोळे पाणावले; कागदपत्रांसह रक्कम केली परत,संगमनेरमधील घटना

शिर्डीच्या भाविकांना साईबाबांची वचने सहज वाचता यावीत, यासाठी ती मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये कोरण्यात आली आहेत. एका शिळेची किंमत जवळपास नऊ लाख रुपये आहे. तिन्ही शिळांची एकूण किंमत सुमारे २७ लाख रुपये आहे. एवढ्या मोठ्या किमतीची भेट अर्पण करूनही दात्यानं प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत केलं आहे.

भाविकांना आता साईबाबांच्या ११ वचनांचे दर्शन घेता येणार (Shirdi Saibaba)

साईबाबा संस्थानच्या वतीने या तिन्ही संगमरवरी शिळा मंदिर परिसर तसेच प्रसादालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दर्शनासाठी आणि प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता साईबाबांच्या ११ वचनांचे दर्शन घेता येणार आहे. श्रद्धा-सबुरी विश्वास आणि समर्पणाचा संदेश देणारी ही वचने भाविकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत, असे शिर्डी संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं आहे.