
Illegal scented tobacco : नगर : नेवासा येथील माळीवस्ती परिसरात घरातून अवैधरीत्या सुगंधी तंबाखू (Illegal scented tobacco) आणि सुपारी मिश्रित मावा तयार करून विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सोमवारी (ता. २६) संबंधित ठिकाणी छापा टाकून १ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी जावेद फज्जु शेख (वय ३०, रा. माळीवस्ती, नेवासा) याच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांची माहिती
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांची माहिती घेत होते. याचदरम्यान, माळीवस्ती येथील एका घरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि सुपारी मिश्रित मावा तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
१ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Illegal scented tobacco)
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी जावेद शेख याला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून तयार मावा, विविध रंगांची सुगंधी तंबाखू, सुपारी, एक इलेक्ट्रिक वजनकाटा आणि मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी मशीन असा एकूण १ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे तसेच पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, आजीनाथ पाखरे आणि रमीझराजा आतार यांचा समावेश होता.


