महाडीबीटीवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
Free sorghum seeds for farmers : कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि रब्बी हंगामातील पिकांवर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना ज्वारी लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य या घटकातून मोफत ज्वारी बियाणे (Free sorghum seeds for farmers) मिनिकिटचे वितरण करण्यात येणार आहे. सन २०२६-२७ या वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्याला २१ हजार २० मिनिकिटचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी
महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. सद्यस्थितीतील दुष्काळसदृश परिस्थितीत पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने कमी पाण्यात येणाऱ्या पिकांच्या लागवडीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. रब्बी ज्वारी हे कमी पाण्यावर येणारे महत्त्वाचे तृणधान्य आणि चारा पीक आहे. त्यामुळे उपलब्ध कृषी निविष्ठांचा कार्यक्षम वापर करून ज्वारीचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
चारा उपलब्ध होण्यास मदत (Free sorghum seeds for farmers)
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना चार किलोच्या पॅकिंगमध्ये ज्वारी बियाणे मिनिकिट मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका मिनिकिटमधील बियाणे एक एकर क्षेत्रासाठी वितरित केले जाणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी विकसित केलेल्या फुले यशोमती या वाणाचा यासाठी समावेश करण्यात आला आहे. फुले यशोमती हे वाण कोरडवाहू आणि अवर्षणप्रवण भागासाठी योग्य असून, कमी पाण्यात लवकर पक्व होणारे आहे. या वाणापासून चांगल्या प्रतीचा कडबा मिळत असल्याने चारा टंचाईच्या परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते.
या वाणातून हेक्टरी ४० ते ५० किंटल कडबा उत्पादन मिळू शकते, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. कर्जत-जामखेड सह अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्वारीला राज्यभरातून मागणी असते. या भागातील स्वादिष्ट आणि नैसर्गिक ज्वारीला ग्राहकांची पसंती मिळते. त्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारी लागवडीचा विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



