
पक्षकारांनी २८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत; तहसीलदार गायत्री सौंदाणे यांचे आवाहन
Revenue Lok Adalat : पारनेर : महसूल प्रशासनातील (Revenue Department) अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले जमिनीविषयक दावे आणि विविध महसुली वाद परस्पर संमतीने निकाली काढण्यासाठी पारनेर तहसील कार्यालयात ४ नोव्हेंबर रोजी महसूल लोकअदालतीचे (Revenue Lok Adalat) आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संबंधित पक्षकारांनी आवश्यक कागदपत्रांसह २८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी केले आहे.
दीर्घकाळ प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली काढणार
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार राज्यभरात १ सप्टेंबर ते ३१ मार्च या कालावधीत ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश महसूल न्यायालयांमध्ये दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रकरणे सामोपचाराने आणि जलदगतीने निकाली काढणे हा आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये लागणारा वेळ कमी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
लोकअदालतीत ही प्रकरणे विचारार्थ घेणार (Revenue Lok Adalat)
या लोकअदालतीमध्ये दरखास्त दावे, रस्ता वहिवाटीसंबंधी वाद, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम १४३ अन्वये दाखल प्रकरणे, तसेच मामलतदार न्यायालय अधिनियम १९०६ मधील कलम ५ (२) अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय वारस नोंदी, अधिकार अभिलेखासंबंधी वाद, ज्येष्ठ नागरिकांचे निर्वाह व कल्याण अधिनियमांतर्गत प्रकरणे आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम ८५ नुसार वाटपाची प्रकरणेही लोकअदालतीत विचारार्थ घेतली जाणार आहेत.
जमिनीच्या हद्दी, रस्त्याची वहिवाट, वारस नोंदी आणि अन्य महसुली बाबींवरून अनेकदा नागरिकांमध्ये वाद निर्माण होतात. अशा प्रकरणांमध्ये परस्पर संमतीने तोडगा निघाल्यास संबंधित पक्षकारांचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होते. तसेच न्यायालयांवरील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी होण्यासही हातभार लागतो.
त्यामुळे संबंधित पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून महसूल लोकअदालतीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी केले आहे.


