Illegal slaughterhouse : नगर : शहरातील कादरीनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर (Illegal slaughterhouse) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एका विधिसंघर्षित बालकासह नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, तब्बल १ हजार ९०० किलो गोमांस, छोटा हत्ती वाहन, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे आणि वजनकाटा असा एकूण ९ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी (Main accused) मात्र पसार झाले आहेत.
नक्की वाचा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद आणि धर्मध्वजारोहण
कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यात अवैध धंद्यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान, ३० ऑक्टोबर रोजी हे पथक संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना कादरीनगर येथील गौसो रजा मस्जिदजवळील गल्ली क्रमांक २ व ३ येथे गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सोमू ऊर्फ आतीक रफीक कुरेशी आणि अनस सरवर कुरेशी हे काही साथीदारांसह कत्तल करत असल्याची माहिती पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी काही जण गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सद्दाम मोहम्मद जावेद कुरेशी (वय २९), गुलाम जर्रानी रब्बानी सौदागर (वय १९), गुलाम मुस्तफा मुश्पीक शेख (वय २०), आवेज जानू कुरेशी (वय २१), आसीफ इक्बाल खान (वय ३२), कैस अश्पाक कुरेशी (वय २७), याकुब रज्जाक कुरेशी (वय ४२), परवेश जानू कुरेशी (वय २६) आणि एका १७ वर्षीय विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
९ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Illegal slaughterhouse)
चौकशीत ताब्यातील आरोपींनी अनस सरवर कुरेशी आणि सोमू ऊर्फ आतीक रफीक कुरेशी यांच्या सांगण्यावरून गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मात्र, हे दोघेही सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.या छाप्यात पोलिसांनी १ हजार ९०० किलो गोमांस, छोटा हत्ती वाहन, दोन कुऱ्हाडी, दोन सुरे आणि एक वजनकाटा असा एकूण ९ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित वाहनाच्या मालकाचीही ओळख अद्याप पटलेली नसून तोही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.



