
Nilesh Lanke : अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (ADCC Bank Election) पारनेरच्या प्रतिष्ठेच्या लढतीत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून लंके यांनी एकूण १०४ मतदानांपैकी ६४ मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.
राहुल शिंदे यांचा पराभव
त्यांचे प्रतिस्पर्धी आणि विखे समर्थक मानले जाणारे भाजपचे राहुल शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालाने जिल्हा बँकेच्या राजकारणात लंके यांनी दमदार प्रवेश केला असून विखे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. जिल्ह्यातील दहा जागांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पारनेर लढत बनली होती विशेष प्रतिष्ठेची (Nilesh Lanke)
यापूर्वीच अकरा जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित दहा जागांच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यातही पारनेर मतदारसंघातील लढत विशेष प्रतिष्ठेची बनली होती. या लढतीत खासदार लंके आणि भाजपचे राहुल शिंदे आमनेसामने होते. दोन्ही बाजूंनी विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. मात्र, मतमोजणीचा निकाल जाहीर होताच लंके यांनी बाजी मारली. ६४ मतांचा कौल मिळवत त्यांनी प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू मानली जाते. या बँकेच्या सत्ताकारणात प्रवेश मिळवण्यासाठी जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. अशा परिस्थितीत पारनेरमधून मिळालेला लंके यांचा विजय केवळ एका जागेपुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण देणारा ठरण्याची शक्यता आहे. विखे समर्थक उमेदवाराचा पराभव आणि लंके यांचा विजय यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात आता कोणाचे पारडे जड ठरणार, याची उत्सुकता वाढली आहे.


