Tuberculosis-free India : क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने मोठी झेप; मृत्यूदरात ३८ टक्क्यांची घसरण!

0
Tuberculosis-free India : क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने मोठी झेप; मृत्यूदरात ३८ टक्क्यांची घसरण!

नगर : ‘क्षयरोग मुक्त भारत’ (Tuberculosis-free India) हे स्वप्न आता केवळ कागदावर राहिले नसून प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) २०२६ च्या ताज्या अहवालाने भारताच्या या आरोग्यक्रांतीवर शिक्कामोर्तब केले आहे. २०१५ पासून क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात भारतात ३८ टक्क्यांची घट (38 percent decline in India) नोंदविण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२६ च्या जागतिक क्षयरोग अहवालात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. औषधांना प्रतिसाद देणाऱ्या क्षयरुग्णांवरील उपचारांचा यशदर ९४ टक्के असल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

नक्की वाचा : पुण्यातील शिवाजीनगर आगाराची मोठी झेप! १६७ बसेसचा ७० हजार १९२ किलोमीटरचा प्रवास

क्षयरोग निर्मूलनासाठी देशभरात विशेष मोहीम (Tuberculosis-free India)

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत लवकर निदान, त्वरित उपचार, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक्स-रे तपासणी आणि पोषण साह्य यांवर भर दिला जात आहे. नि-क्षय पोषण योजना आणि नि-क्षय मित्र उपक्रमातून रुग्णांना उपचारादरम्यान आर्थिक व पोषणविषयक मदत दिली जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने क्षयरोगाचे संभाव्य हॉटस्पॉट आणि अधिक जोखमीचे रुग्ण शोधले जात आहेत. क्षयरोग निर्मूलनासाठी देशभरात शंभर दिवसांच्या विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांमध्ये कोट्यवधी नागरिकांची तपासणी करण्यात आली. छातीचे एक्स-रे आणि आधुनिक आण्विक निदान तंत्रज्ञानामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांचेही निदान शक्य झाले आहे.

अवश्य वाचा : रिंकू राजगुरूच्या नजरेतून दिसणार स्त्रीच्या संघर्षाची नवी कहाणी; ‘जिजाई’चा ट्रेलर प्रदर्शित!

क्षयरोग निर्मूलनासाठी सरकार प्रयत्नशील (Tuberculosis-free India)

ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संघटना, खासगी रुग्णालयांचा या मोहिमेत सहभाग वाढविण्यात येत आहे. क्षयरोगमुक्त भारताच्या मोहिमेत युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘जोश टीम्स’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात राष्ट्रीय छात्र सेना आणि ‘माय भारत’ स्वयंसेवकांचा समावेश आहे. जनसहभाग, जनजागृती, प्रतिबंधात्मक उपचार, पोषण साह्य आणि प्रभावी उपचारांच्या माध्यमातून क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

क्षयरोगाच्या विळख्यातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या ही देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठी एक मोठी आनंदाची बातमी असून, या यशस्वी वाटचालीने ‘स्वस्थ भारता’च्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.