Nilesh Lanke : पारनेर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central Cooperative Bank) संचालकपदी निवड झाल्याबद्दल खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचा पारनेर येथे जिल्हा बँकेचे तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच तालुका सचिव संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील अनेक गावांमधील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना (Service Co-operative Societies) स्वमालकीच्या इमारती नसल्याचा प्रश्न उपस्थित झाला. या संस्थांच्या स्वमालकीच्या इमारती उभारण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, अशी ग्वाही खासदार लंके यांनी दिली.
नक्की वाचा : अहिल्यानगर येथे १७ नोव्हेंबरपासून ६५ व्या राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ
कर्जवाटप करण्यावर यापुढील काळात भर
पारनेर येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात रविवारी (ता.१५) झालेल्या या कार्यक्रमात लंके यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व गटसचिवांशी संवाद साधला. जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे महत्त्वपूर्ण काम बँकेच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे खरीप हंगामातील पीककर्ज, संकरित गायींच्या खरेदीसाठी कर्ज, ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज आदींसाठी जास्तीत जास्त कर्जवाटप करण्यावर यापुढील काळात भर दिला जाईल. कोणताही गरजू शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सहकार्य करण्याचे आवाहन (Nilesh Lanke)
जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत एटीएम सुविधा तसेच सोनेतारण कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना बँकिंग सेवा अधिक सुलभतेने मिळाव्यात, हा त्यामागील उद्देश आहे. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावातील सेवा संस्था सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. पारनेर तालुका कर्जवसुलीमध्ये जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असून यापुढेही हा लौकिक कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. बँकेचे कर्मचारी आणि गटसचिव हे सहकार व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या अडचणी सोडविण्यासोबतच बँक आणि सेवा संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यावर आपला भर राहील.
सेवा संस्था आणि जिल्हा बँक या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय राहिल्यास शेतकऱ्यांना कर्जवाटपात कोणतीही अडचण येणार नाही, असे लंके यांनी स्पष्ट केले.यावेळी तालुका विकास अधिकारी गायकवाड, वसुली अधिकारी पठारे, तालुका सचिव चंदन, सचिव संघटनेचे अध्यक्ष दत्ता पतके, खरमाळे, मंचरे आदींच्या उपस्थितीत खासदार लंके यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे कर्मचारी, गटसचिव आणि सचिव संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



