Pune News : पुण्यातील शिवाजीनगर आगाराची मोठी झेप! १६७ बसेसचा ७० हजार १९२ किलोमीटरचा प्रवास

0
Pune News : पुण्यातील शिवाजीनगर आगाराची मोठी झेप! १६७ बसेसचा ७० हजार १९२ किलोमीटरचा प्रवास

नगर : लालपरी ही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांची आणि सर्वसामान्यांची खरी जीवनवाहिनी मानली जाते. प्रवाशांच्या सेवेसाठी ती अहोरात्र धावत असते. ऐन दिवाळीत हीच सेवा देत एसटी महामंडळाच्या पुण्यातील (Pune News) शिवाजीनगर आगाराने (Shivajinagar Bus stand) आपल्या कार्यक्षमतेचा एक नवा उच्चांक गाठला आहे. या आगारातील १६७ बसेसनी (167 buses) एकाच दिवसात तब्बल ७० हजार १९२ किलोमीटरचा यशस्वी प्रवास पूर्ण करत एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

नक्की वाचा : अमूल नंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ होणार; नूतन अध्यक्षांचे संकेत

शिवाजीनगरच्या १६७ बसने केला ७० हजार किलोमीटरचा प्रवास (Pune News)

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे एसटी महामंडळाच्या पुण्यातील शिवाजीनगर आगाराने एका दिवसात सर्वाधिक अंतर कापण्याचा विक्रम नोंदविला आहे. पाच नोव्हेंबरला आगाराच्या १६७ बसनी मिळून ७० हजार १९२ किलोमीटरचा प्रवास केला. राज्यातील एसटी आगारांमध्ये एका दिवसात कापलेले हे सर्वाधिक अंतर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. विशेष म्हणजे, या दिवशी प्रवासी वाहतुकीतून आगाराला ४९ लाख ४७ हजार ९९८ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

अवश्य वाचा : रिंकू राजगुरूच्या नजरेतून दिसणार स्त्रीच्या संघर्षाची नवी कहाणी; ‘जिजाई’चा ट्रेलर प्रदर्शित!

कोणत्या दिवशी किती किलोमीटर केला प्रवास? (Pune News)

दिवाळीच्या निमित्ताने पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे एसटी महामंडळाकडून विविध मार्गांवर जादा बस सोडण्यात आल्या होत्या. शिवाजीनगर आगारातूनही प्रवाशांच्या सोयीसाठी बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली. त्याचा परिणाम दैनंदिन प्रवासाच्या अंतरावर झाला. आगाराच्या बस साधारणपणे दररोज ६० ते ६३ हजार किलोमीटर धावतात. मात्र, पाच नोव्हेंबरला त्यांनी नेहमीपेक्षा सुमारे सात ते दहा हजार किलोमीटर अधिक अंतर कापले.

शिवाजीनगर आगाराने दिवाळीच्या काळात सलग सहा दिवस ६६ हजार ते ७० हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापले. एक नोव्हेंबरला ६६ हजार ३८४, तर दोन नोव्हेंबरला ६६ हजार ४७१ किलोमीटर अंतराची नोंद झाली. तीन नोव्हेंबरला ७० हजार १८४ किलोमीटर, तर चार नोव्हेंबरला ६६ हजार ६७१ किलोमीटर, पाच नोव्हेंबरला ७० हजार १९२ किलोमीटरचा टप्पा गाठला. तर सहा नोव्हेंबरला ६७ हजार ६४ किलोमीटर अंतर बसने पार केलं. यामुळे दिवाळीच्या काळात शिवाजीनगर आगारातील बसची प्रवासी वाहतूक किती मोठ्या प्रमाणात सुरू होती, हे स्पष्ट होते.

शिवाजीनगर आगारातून लालपरी सह ‘शिवशाही’, ‘शिवनेरी’, ‘हिरकणी’, ‘जनशिवनेरी’, ‘शयनयान’ अशा विविध बस प्रवाशांच्या सेवेत होत्या. पुण्यातील वाकडेवाडी येथील शिवाजीनगर आगारातून दररोज दोनशेहून अधिक बसची वाहतूक होते. याशिवाय अन्य आगारांच्या सुमारे १,३६० बसची ये-जा या ठिकाणी सुरू असते. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने या आगाराचे महत्त्व मोठे आहे. शिवाजीनगर आगाराचा हा विक्रम केवळ आकड्यांचा खेळ नसून, तो एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची आणि प्रवाशांच्या अतुट विश्वासाची पोचपावती असल्याचा बोललं जात आहे.