State Drama Competition : अहिल्यानगर येथे १७ नोव्हेंबरपासून ६५ व्या राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ

स्पर्धेच्या तयारीसाठी कलाकार आपापल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून तालमी करत आहेत

0
State Drama Competition : अहिल्यानगर येथे १७ नोव्हेंबरपासून ६५ व्या राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ
State Drama Competition : अहिल्यानगर येथे १७ नोव्हेंबरपासून ६५ व्या राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ

State Drama Competition : नगर : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या (State Drama Competition) अहिल्यानगर केंद्रावरील प्राथमिक फेरीसाठी नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली आहे. शहरातील माऊली सभागृह (Mauli Auditorium) सावेडी येथे १७ नोव्हेंबर २०२६ पासून या स्पर्धेला प्रारंभ होणार असून, दररोज रात्री ८ वाजता नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. अहिल्यानगर व परिसरातील नाट्यरसिकांना दिवाळीनंतर दर्जेदार नाट्यप्रयोगांची (Drama Performances) मेजवानी अनुभवता येणार आहे.

नक्की वाचा : चीनमधील बुद्धिबळ खेळणारा अत्याधुनिक रोबोट प्रथमच अहिल्यानगरमध्ये

महाराष्ट्राला समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा

महाराष्ट्राला समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा लाभला आहे. या परंपरेचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच हौशी कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी राज्य नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध नाट्यसंस्थांमधील कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांना आपली कलाकृती सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कसून सराव सुरू (State Drama Competition)

शहर , तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागांतील एकूण २३ नाट्यसंस्था या केंद्रावरील प्राथमिक फेरीत सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या तयारीसाठी कलाकार आपापल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून तालमी करत आहेत. संवादफेक, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा आणि रंगमंचावरील हालचाली यांचा कसून सराव सुरू आहे. यंदाच्या स्पर्धेत विविध विषयांवरील नाटके सादर होणार असल्याने प्रेक्षकांना वेगवेगळ्या आशयांचे आणि नाट्यशैलींचे दर्शन घडणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी नाट्यसंस्थांमध्ये कलात्मक चुरस पाहायला मिळणार असून, कलाकारांच्या मेहनतीचा आणि सर्जनशीलतेचा अनुभव नाट्यरसिकांना घेता येणार आहे.

माऊली सभागृह सावेडी येथे होणाऱ्या या स्पर्धेतील नाट्यप्रयोगांना नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

स्पर्धेचा तपशील :
• केंद्र : अहिल्यानगर
• नाट्यगृह : माऊली सभागृह
• स्पर्धा प्रारंभ : १७ नोव्हेंबर २०२६  ते ११ डिसेंबर २०२६ पर्यंत
• प्रयोगाची वेळ : दररोज रात्री ८.०० वाजता
• प्रवेश : शुल्क रु.१० व १५ रुपये