Chess-playing Robot : नगर : बुद्धिबळ खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शांतीकुमारजी फिरोदिया अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा (Shantikumarji Firodia All-India Open International Rated Chess Tournament) प्रारंभ सोहम फिरोदिया आणि अनुष्का फिरोदिया यांच्या हस्ते बुद्धिबळ पटावर चाल देऊन करण्यात आले. यावेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, मान्यवर, खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, एस.टी. स्टँड रोड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे चीनमधून आणण्यात आलेला अत्याधुनिक बुद्धिबळ खेळणारा रोबोट! हा रोबोट प्रत्यक्ष खेळाडूंशी बुद्धिबळाचा डाव खेळत असून, अहिल्यानगरमध्ये प्रथमच बुद्धिबळप्रेमींना रोबोटसोबत (Robot) खेळण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि बुद्धिबळ यांचा संगम अनुभवण्यासाठी खेळाडू, पालक आणि नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. स्पर्धेच्या प्रारंभी संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संघटनेच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, या स्पर्धेचे विशेष आकर्षण असलेल्या अत्याधुनिक बुद्धिबळ रोबोटसोबत खेळण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे. त्यामुळे खेळाडूंना एक आगळावेगळा अनुभव घेता येणार असून, बुद्धिबळाच्या खेळाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.
नक्की वाचा : फिरोदिया शिवाजियन्सचा संघ प्रतिष्ठेच्या ऑल इंडिया गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना
नरेंद्र फिरोदिया म्हणाले की
जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, अहिल्यानगरमधून बुद्धिबळ खेळाचा प्रचार आणि प्रसार सातत्याने होत आहे. दरवर्षी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांना मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होतात. बुद्धिबळ खेळाडूं साठी शंभरहून अधिक बुद्धिबळ इंटरनॅशनल वुडन बोर्ड उपलब्ध करून देण्या बरोबरच आता चीनमधील अत्याधुनिक रोबोट आणण्यात आला आहे. रोबोट सोबत खेळण्यामुळे खेळाडूंचा खेळ अधिक दर्जेदार होण्यास मदत होईल. भारतामध्ये शंभरहून अधिक ग्रँडमास्टर झाले असून, अहिल्यानगर मधून ही अजुन एक ग्रँडमास्टर तयार करण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे. बुद्धिबळ हा असा खेळ आहे की, तो एकट्या व्यक्तीलाही मोबाईल वर खेळता येतो. त्यामुळे बुद्धिबळाचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार व्हावा, हा आमचा मानस आहे. आधुनिक युगा नुसार बुद्धिबळा साठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत देशभरातून २५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. दिव-दमण, गुजरात, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांमधून खेळाडू सहभागी झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील यवतमाळ, वर्धा, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, पालघर, नाशिक, नांदेड, नागपूर, मुंबई, जालना, जळगाव, हिंगोली, धुळे, धाराशिव, चंद्रपूर, बुलढाणा, बीड आणि अकोला येथील खेळाडूंनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बुद्धिबळ खेळणारा रोबोट खेळाडूंशी प्रत्यक्ष डाव खेळणार (Chess-playing Robot)
या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खेळाडूंच्या वयोगटातील विविधता. अवघ्या साडेचार वर्षांच्या बाल खेळाडू पासून ते ८७ वर्षांच्या ज्येष्ठ खेळाडूपर्यंत विविध वयोगटांतील बुद्धिबळपटू आपले कौशल्य पणाला लावत आहेत. चीनमधून आलेला बुद्धिबळ खेळणारा यंत्रमानव खेळाडूंशी प्रत्यक्ष डाव खेळणार असल्याने नगरमधील तसेच बाहेरगावच्या खेळाडूंना त्याच्यासोबत बुद्धिबळ खेळण्याची संधी मिळणार आहे. बुद्धिबळ खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांसाठी हा अनुभव विशेष ठरणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी दिली.
या वेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, सचिव यशवंत बापट, सुबोध ठोंबरे, शाम कांबळे, पारुनाथ ढोकळे, संजय खडके, प्रकाश गुजराथी, स्वप्निल भगुरकर विशाल गुजराथी, दत्ता घाडगे, संजय जोशी, मनीष जसवानी, चेतन कड, पंच प्रवीण ठाकरे, पवन राठी, शार्दुल तापसे, शिशिर इंदुरकर, विजय चोरडिया, प्रशांत धंगेकर, देवेंद्र ढोकळे, अनुराधा बापट, शुभदा ठोंबरे, रोहिणी आडकर आदींसह खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



