Sugar Factory : संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने (Bhausaheb Thorat Cooperative Sugar Factory) ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ३२०० रुपयांची पहिली उचल मान्य नसल्याची भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. ऊसदरवाढीच्या (Increase in Sugarcane Price) प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कारखाना प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Movement) करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिला.संगमनेर येथील शासकीय विश्राम गृहावर शेतकरी नेत्यांच्या उपस्थिती मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी शेतकरी नेते तथा साखर अभ्यासक वसंतराव गुंजाळ यांनी थोरात साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालातील विविध आर्थिक आकडे वारीचा संदर्भ देत साखर कारखाना व्यवस्थापनाच्या कारभारावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले.
नक्की वाचा : सेवा संस्थांच्या स्वमालकीच्या इमारतींसाठी पुढाकार घेणार; खासदार लंके यांची ग्वाही
कारखान्याच्या आर्थिक अनियमिततेबाबत संशय
अहवालातील काही आकडेवारी आणि आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी होणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी कारखान्यात कोट्यवधी रुपयांच्या संभाव्य आर्थिक अनियमिततेबाबत संशय व्यक्त केला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात हे कारखान्याचे चेअरमन असताना केवळ साखर उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे उसाला ११०० रुपये भाव दिला जात होता. मात्र, सध्याच्या काळात साखरेबरोबरच इतर माध्यमांतून ही साखर कारखान्यांना उत्पन्न मिळत आहे.असे असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केवळ ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर करणे ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. साखर कारखान्यात उत्पादित होणाऱ्या साखरेला बाजारात चांगला भाव मिळतो, मग शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या उसाला चांगला भाव का मिळत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ऊसदराच्या प्रश्नावर तीव्र नाराजी (Sugar Factory)
शेतकरी नेते संतोष रोहम यांनीही ऊसदराच्या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली. साखरेला बाजारात चांगला भाव मिळत असेल, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव का मिळत नाही, असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा, यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. ऊसदराच्या प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन त्यांना आंदोलनात सहभागी होणार का, अशी विचारणा केली असता, शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन होत असेल तर मी स्वतः या आंदोलनात सहभागी होईल, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे रोहम यांनी सांगितले.राज्यातील ऊसदराचा प्रश्न केवळ एका कारखान्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित आहे.
त्यामुळे ऊसदरवाढीचा निर्णय राज्य स्तरावर होणे अपेक्षित आहे.कर्नाटक राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३६०० रुपये भाव दिला जात आहे. मग महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना अधिक भाव देण्यात अडचण काय, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. महाराष्ट्रा तील शेतकऱ्यांनाही उत्पादन खर्चाचा विचार करून योग्य दर मिळायला हवा, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली.
आंदोलन तूर्तास पुढे ढकलण्यात आले
राज्यभरातील ऊसदराचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी गुरुवार, १९नोव्हेंबर रोजी रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र, ऊस दराच्या प्रश्नावर राज्यस्तरावर निर्णय होण्याची शक्यता आणि कारखाना प्रशासनाला चर्चेसाठी वेळ मिळावा, या उद्देशाने आंदोलन तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. कारखाना प्रशासनाला यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत कारखाना प्रशासनाने शेतकरी प्रतिनिधींशी चर्चेची तयारी दर्शविल्यास आम्ही चर्चेस तयार आहोत. मात्र, १५ दिवसांत ऊसदरा च्या प्रश्नावर समाधानकारक तोडगा न निघाल्यास संगमनेर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्यासंख्येने रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा संतोष रोहम यांनी दिला.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, शेतकरी नेते दीपक वाळे,रमेश शिंगोटे रोहिदास खताळ, रोहिदास साबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.



