
Municipal Corporation : नगर : शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा दूर करण्यासाठी आणि शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेने (Municipal Corporation) बुधवारी (ता. २५) सकाळपासून पुन्हा एकदा धडक अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि पदपथांवर केलेली अतिक्रमणे (Encroachment) हटवण्यास सुरुवात झाली आहे. ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी दिली.
नक्की वाचा : दरेवाडी येथील मुरूम उपशाला परवानगी नाही; कथीत व्हिडिओवर जिल्हा प्रशासनाचा खुलासा

दैनंदिन वाहतुकीला मोठा अडथळा
बुधवारी सकाळी जुन्या महानगरपालिका कार्यालयापासून या कारवाईला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पथकाने वाडिया पार्क आणि आयुर्वेद कॉर्नर परिसरात देत रस्ते व फुटपाथवर बेकायदेशीररीत्या उभारलेल्या टपऱ्या, पत्र्याचे शेड, अनधिकृत फलक आणि ओटे हटवले. यासोबतच नवीन टिळक रोड, सक्कर चौक, कोठी परिसर आणि बालिकाश्रम रोड या भागांतही ही मोहीम राबवण्यात येत आहे. या भागांतील अडथळे दूर करून रस्ते मोकळे करण्याचे काम पथकामार्फत सुरू आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने दैनंदिन वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. तसेच ठिकठिकाणी लावलेल्या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत होते. या बाबींची दखल घेत प्रशासनाने ही कारवाई सुरू केली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यशवंत डांगे यांचा इशारा (Municipal Corporation)
महानगरपालिका प्रशासनाकडून शहरात सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात असून, यापुढेही ती अशीच सातत्याने सुरू राहणार आहे. मागील महिन्यात बालिकाश्रम रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून हा मार्ग मोकळा करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा संपूर्ण शहरात ही मोहीम प्रभावीपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून तातडीने काढून घ्यावीत, अन्यथा महानगरपालिकेकडून कायदेशीर कारवाई करून ती हटवली जातील. या कारवाईदरम्यान साहित्याचे नुकसान झाल्यास महानगरपालिका त्यास जबाबदार राहणार नाही, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.


