ACB : पाथर्डी : निवृत्त सनदी अधिकारी तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी प्रादेशिक अधिकारी दिलीप कोंडीबा खेडकर (Dilip Kondiba Khedkar) यांच्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील निवासस्थानासह विविध ठिकाणच्या मालमत्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी (ता.२९) पहाटे एकाचवेळी छापे टाकल्याने तालुक्यात खळबळ उडाली. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून, अहिल्यानगर एसीबीचे अधिकारी-कर्मचारी तसेच पाथर्डी पोलिसांचीही (Pathardi Police) मदत घेण्यात आली. कारवाईसाठी ३० हून अधिक अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले असून, मोठा लवाजमा बालगाव भल्या पहाटे दाखल झाला होता. अनेक तास झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. पंढरीनाथ शंकर साबळे यांनी २०१२ साली तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, एसीबीने दाखल केलेल्या एफआयआरनुसार दिलीप खेडकर व त्यांच्या पत्नी मनोरमा दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी पोलीस ठाण्यात आज (ता. २९) गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारदार म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक सविता देविदास तांबे यांनी तक्रार दाखल केली आहे.
नक्की वाचा : ‘सारथी’ संस्थेला १२२ कोटी, तर अण्णासाहेब पाटील महामंडळास १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर : विखे पाटील
इतर रकमांचा तपशील
एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, दिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात १९८९ पासून सेवेत होते. विविध ठिकाणी उपप्रादेशिक अधिकारी व प्रादेशिक अधिकारी म्हणून त्यांनी काम केले असून, ३१ मे २०२३ रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या मालमत्तेबाबत यापूर्वी सुरू असलेल्या चौकशीचा कालावधी १९९५ ते डिसेंबर २०२३ असा निश्चित करण्यात आला होता. या कालावधीत खेडकर व त्यांच्या कुटुंबीयांचे उत्पन्न, खर्च, मालमत्ता आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
तपासणी कालावधीत खेडकर कुटुंबाचे एकूण ज्ञात उत्पन्न १३ कोटी २ लाख ७८ हजार ७७५ रुपये, तर एकूण खर्च १५ कोटी ३३ लाख ७४ हजार ८५५ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्ञात मालमत्तेचे मूल्य १० कोटी ९९ लाख ८५ हजार ६१६ रुपये असल्याचे नमूद आहे. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांच्या तुलनेत मालमत्ता व खर्चाची रक्कम १३ कोटी ३० लाख ८१ हजार ६९६ रुपये, म्हणजेच ज्ञात उत्पन्नाच्या सुमारे १०२ टक्के अधिक आहे.एफआयआरच्या कागदपत्रांमध्ये खेडकर यांना सेवाकालात मिळालेले निव्वळ उत्पन्न, संगणक खरेदीसाठी घेतलेली आगाऊ रक्कम, बँक कर्ज, एलआयसी पॉलिसींमधून मिळालेल्या रकमांसह सेवानिवृत्तीच्या वेळी मिळालेले जीपीएफ, रजा रोखीकरण, ग्रॅच्युइटी, पीएफ तसेच इतर रकमांचा तपशील देण्यात आला आहे. कागदपत्रांमध्ये नमूद उत्पन्नाची विविध रक्कम आणि तिचे स्रोत स्वतंत्रपणे नोंदविण्यात आले आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नॅशनल हाउसिंग सोसायटीतील मालमत्तेचाही उल्लेख (ACB)
याउलट, कुटुंबाच्या खर्चाच्या नोंदींमध्ये स्थावर मालमत्ता, बांधकाम, फर्निचर व वस्तूंची खरेदी, वाहनांवरील खर्च, इंधन, शिक्षण, विमा, बँक व्यवहार तसेच अन्य विविध खर्चांचा समावेश असल्याचे एफआयआरच्या जोडपत्रातील नोंदींवरून दिसून येते. या खर्चांची एकूण रक्कम १५ कोटी ३३ लाख ७४ हजार ८५५ रुपये असल्याचे अंतिम निष्कर्षात नमूद आहे. एफआयआरमध्ये पुण्यातील बाणेर येथील नॅशनल हाउसिंग सोसायटीतील मालमत्तेचाही उल्लेख आहे. तसेच बाणेर रोड परिसरातील सुमारे ७५० चौरस फूट क्षेत्रावरील फ्लॅटच्या बांधकामासाठी तसेच फर्निचर व वस्तू खरेदीसाठी झालेल्या खर्चाची स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे. या खर्चासाठी ७० लाख ३८ हजार ६२४ रुपये अशी रक्कम नमूद आहे.
प्राप्त कागदपत्रांची छाननी
कागदपत्रांमध्ये वाहनांची खरेदी-विक्री, वाहनांच्या देखभालीवरील खर्च, टेलिफोन व मोबाईलवरील खर्च, विविध बँक व्यवहार, विमा आणि इतर आर्थिक व्यवहारांच्याही नोंदी आहेत. एकूण १२७ नोंदींच्या माध्यमातून उत्पन्न, खर्च आणि मालमत्तेचा तपशील मांडण्यात आला आहे. गुन्ह्यामध्ये दिलीप कोंडीबा खेडकर आणि त्यांच्या पत्नी मनोरमा दिलीप खेडकर यांना आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. कुटुंबीयांच्या उत्पन्न, मालमत्ता व खर्चाबाबत प्राप्त कागदपत्रांची छाननी करून एसीबीने हा निष्कर्ष नोंदविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
खेडकर कुटुंबाच्या विविध मालमत्ता, बँक खात्यांतील व्यवहार, कर्ज, वाहनांवरील खर्च तसेच कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणावरील खर्चाचाही तपशील देण्यात आला आहे. या सर्व नोंदींच्या आधारे उत्पन्न आणि खर्च यांची पडताळणी करण्यात आली आहे. खेडकर यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशीचा अहवाल तयार करून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर दिलीप खेडकर व त्यांच्या पत्नीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यास परवानगी मिळाल्याचे नमूद आहे. त्यानुसार पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पहाटेपासून झाडाझडती; कागदपत्रांची तपासणी
मंगळवारी पहाटे नाशिक व अहिल्यानगर येथील एसीबीची पथके पाथर्डीत दाखल झाली. त्यानंतर भालगाव येथील खेडकर यांच्या घरासह संबंधित ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली. अनेक तास ही कारवाई सुरू होती. विविध कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी व मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, छाप्यात नेमके कोणते साहित्य अथवा कागदपत्रे जप्त करण्यात आली, याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. यामध्ये कोणालाही अटक अथवा ताबा्या घेण्यात आले नाही . या प्रकरणाचा तपास एसीबीचे पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपुटे हे करीत आहेत.
चौकट:-दिलीप खेडकर हे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील आहेत. पूजा खेडकर यांच्या प्रशासकीय सेवेशी संबंधित वादानंतर खेडकर कुटुंब यापूर्वी चर्चेत आले होते. आता बेहिशोबी मालमत्ता व उत्पन्न-खर्चातील कथित तफावतीच्या प्रकरणात एसीबीने गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केल्याने पाथर्डी तालुक्याचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.



