ADCC Election Politics : नगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक (ADCC Election Politics) बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली असली, तरी बँकेचे राजकारण अधिकच तापले आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Legislative Council Chairman Prof. Ram Shinde) यांनी आज निवडणूक अर्ज घेऊन या बैठकीबाबत प्रश्न उपस्थित केले. आपण निवडणुकीचा अर्ज भरणारच, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना राम शिंदे म्हणाले की, कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांमधून माझ्या नावाचा ठराव झाला असून मी तेथील अधिकृत मतदार आहे. जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असताना निवडणूक बिनविरोध व्हावी असा सूर असला, तरी प्रत्यक्षात अवघ्या दोन दिवसांत ५४१ हून अधिक इच्छुकांनी अर्जांची विक्री केली आहे. एका जागेसाठी २१ अर्ज याप्रमाणे तब्बल २६ पॅनेल तयार होऊ शकतील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विखे-पितापुत्रांच्या भूमिकेवर शाब्दिक गुगली
संगमनेरमधील सर्वपक्षीय बैठकीवर बोलताना शिंदे यांनी भाजपच्या अंतर्गत मतभेदांवर बोट ठेवले. “बिनविरोधसाठी संगमनेरमध्ये बैठक झाली; मात्र तिची कल्पना खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाच नव्हती. दुसरीकडे, या बैठकीला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते,” असे सांगत शिंदे यांनी विखे पिता-पुत्रांमध्येच एकवाक्यता नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या सुचवले. “पालकमंत्र्यांनी स्वतः समोर येऊन या बैठकीबाबत आणि निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मला माहितीच नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.” असेही ते म्हणाले.

हेही पहा : आंदोलनामागचे‘लाभार्थी’ कोण? अण्णा हजारे ते मनोज जरांगे, गोष्ट तीच!
महायुतीत आणि शिवसेना गोटात अस्वस्थता (ADCC Election Politics)
संगमनेर बैठकीनंतर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख आणि विवेक कोल्हे यांनी संपर्क साधला होता; परंतु त्यानंतर कोणतीही चर्चा झाली नाही, असे शिंदे यांनी नमूद केले. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही या बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याने त्यांची वेगळी बैठक सुरू आहे. नेत्यांच्या विधानांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळेच सभासदांमध्ये अस्वस्थता पसरली असून त्यांनी अर्जांची उचल सुरू केली आहे. कायदेशीर आणि तांत्रिक बाबी तपासून आपण अर्ज दाखल करणार असल्याचे सांगत, सर्वसमावेशक निर्णय झाल्यासच पुढील बोलणी शक्य असल्याचे शिंदे यांनी शेवटी स्पष्ट केले.



