ADCC Bank Election : दुष्काळाच्या नावाखाली बिनविरोधची ‘खेळी’; पण मतदार म्हणतात निवडणूक हवी

0
दुष्काळाच्या नावाखाली बिनविरोधची ‘खेळी’; पण मतदार म्हणतात निवडणूक हवी
दुष्काळाच्या नावाखाली बिनविरोधची ‘खेळी’; पण मतदार म्हणतात निवडणूक हवी

ADCC Bank Election : नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पारंपरिक राजकीय विरोधक असलेली घराणीही बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एका छताखाली येत असल्याचे चित्र आहे. मात्र, बँकेच्या सर्वसाधारण सभेत सोसायटी मतदार आणि कारखानदार यांच्यातील मुद्दे ज्या पद्धतीने समोर आले, त्यामुळे बिनविरोधच्या प्रयत्नांपुढे आव्हान निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुष्काळाचे कारण पुढे करून निवडणूक टाळण्याचा प्रयत्न होत असला, तरी प्रत्यक्षात सोसायटी मतदारांमध्ये निवडणूक घेण्याची भूमिका असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेत्यांच्या पातळीवर सुरू असलेल्या बिनविरोधच्या हालचाली आणि मतदारांची भूमिका यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा : बिनविरोधच्या प्रयत्नांना पहिल्याच दिवशी धक्का? श्रीगोंद्यातील ‘या’ नेत्याच्या अर्जाने जिल्हा बँकेचे समीकरण बदलणार?

‘गुंतवणूक’ पाण्यात जाण्याची भीती?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्हाभरातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमधील ठरावधारक मतदार निर्णायक भूमिका बजावणार आहेत. संभाव्य उमेदवारांनी आपल्या बाजूने ठराव करून घेतण्यासाठी आधीच ‘गुंतवणूक’ केलेली आहे. त्याचबरोबर निवडणुकीतील संभाव्य ‘लक्ष्मीदर्शन’ समोर ठेऊन सोसायटी संचालकांनी आपल्या नावाचा ठराव करून घेण्यासाठी संचालक मंडळातील इतर संचालकांचे हात आधीच ‘ओले’ केल्याचेही चित्र आहे. या सर्व परिस्थितीत जर निवडणूक बिनविरोध झाली तर ही आर्थिक आणि राजकीय ‘गुंतवणूक’ पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी बिनविरोध निवडणुकीची सुरु केलेली तयारी मतदारांची धाकधूक वाढवणारी ठरत आहे.

हेही पहा : आंदोलनामागचे‘लाभार्थी’ कोण? अण्णा हजारे ते मनोज जरांगे, गोष्ट तीच!

पहिल्याच टप्प्यात धक्का? (ADCC Bank Election)

बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या उद्देशाने विखे-थोरात यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखानदार नेते नुकतेच संगमनेर येथे एकत्र आले होते. बिनविरोध निवडणुकीबाबत भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून सूचना असल्याचीही चर्चा आहे. मात्र, या बैठकीच्या प्रक्रियेत भाजप नेते तथा विधानपरिषद सभापती राम शिंदे, खासदार निलेश लंके, माजी आमदार राहुल जगताप आणि माजी आमदार प्रताप ढाकणे यांना अपेक्षित पद्धतीने विश्वासात घेण्यात आले नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. परिणामी, या नेत्यांच्या भूमिकेकडे आता विशेष लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीच्या पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बिनविरोधच्या प्रयत्नांना धक्का बसल्याचे मानले जात आहे. एका अर्जानेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय गणित पुन्हा चर्चेत आले आहे.

‘साखर विरुद्ध भाकर’ संघर्षाची नांदी? (ADCC Bank Election)

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी साखर कारखानदार नेते पुढाकार घेत असताना दुसरीकडे सोसायटी मतदारांच्या प्रश्नांनी वेगळेच रूप धारण केले आहे. कारखानदारांकडील थकबाकीचा परिणाम गावोगावच्या सोसायट्यांना मिळणाऱ्या सवलती आणि आर्थिक व्यवहारांवर होत असल्याचा मुद्दा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चेत आला. यामुळे आगामी निवडणुकीत ‘साखर विरुद्ध भाकर’ असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे जिल्ह्यातील साखर कारखानदार नेत्यांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे सोसायटी मतदार आपल्या प्रश्नांवर स्वतंत्र भूमिका घेणार का, हा महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. दरम्यान, राम शिंदे यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील तसेच निलेश लंके यांच्या पारनेर तालुक्यातील काही मतदार सहलीवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अखेर बँकेची निवडणूक बिनविरोध होते की मतदारांच्या भूमिकेमुळे प्रत्यक्ष रणधुमाळी रंगते, याचे उत्तर आगामी काही दिवसांतील घडामोडींवर अवलंबून असणार आहे.