ACB : नगर : प्रधानमंत्री आवास योजनेच्या मंजुरीसाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेविका आणि संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. या प्रकरणात एका आरोपीला रंगेहात पकडण्यात आले असून दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : राहुरी मतदारसंघात चार दिवस ड्राय डे जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
काय आहे प्रकरण
खारे कर्जुने (ता. नगर) येथील तक्रारदाराच्या वडिलांनी सन २०२३ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांचे नाव यादीत आल्यानंतर खात्यात १५ हजार रुपयांचे अनुदानही जमा झाले होते. मात्र, पुढील टप्पा मंजुरीसाठी ग्रामसेविका पुष्पा डेरे यांनी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तसेच घरकुलाची पाहणी करण्यासाठी आलेले ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गौतम सूर्यवंशी यांनीही निधी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
नक्की पहा : खरवंडी फाट्यावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू
रंगेहात पकडले (ACB)
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार तक्रारदार हे लाचेची रक्कम देण्यासाठी ग्रामसेविका डेरे यांच्याकडे गेले असता त्यांनी ती रक्कम सूर्यवंशी यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर निमगाव घाना रोड परिसरात सूर्यवंशी यांनी १० हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे करीत आहेत.



